"उत्पन्न वाढवावे लागेल अन्...", वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी बाबा रामदेव यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:32 AM2022-03-31T09:32:13+5:302022-03-31T10:49:43+5:30
Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
करनाल : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील जनतेला सध्या दररोज महागाईचा झटका बसत आहे. दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev)यांनी लोकांना वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी सल्ला दिला आहे. करनाल येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांना गेल्या आठवडाभरात सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीबाबत विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, या महागाईला तोंड देण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवावे लागेल, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपची बाजू घेताना ते म्हणाले की, सरकार आणि देश चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर वाढवला आहे. याशिवाय, हरयाणा सरकारचे कौतुक करताना योगाऐवजी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यावर चित्रपट बनवण्याबाबत बाबा रामदेव यांनी भाष्य केले.
'लोकांना अधिक मेहनत करावी लागेल'
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर योगगुरू रामदेव म्हणाले, "आता त्यांना सरकार चालवण्यासाठी कर घ्यावा लागेल. महागाई आहे तर काही उत्पन्न वाढवावे लागेल. अधिक मेहनत करावी लागेल. मी संन्यासी असल्याने १८-१८ तास काम करतो. इतर लोकही काम करतील तर कमावतील आणि महागाईही सहन करतील. देशाची प्रगती होईल."
'द काश्मीर फाइल्सचे काही भाग पाहिले'
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर स्वामी रामदेव म्हणाले की, "काश्मिरी पंडितांवर जे अत्याचार, तोडफोड झाली. त्यासंदर्भात चित्रपटात दाखविण्यात आले आहे. मी 'द काश्मीर फाइल्स' चे काही भाग पाहिले आहेत. ज्या लोकांनी भारताला एकाकी पाडले आहे. हे क्षुद्र राजकारण आहे. त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे."
'योगाऐवजी मनोहर लाल यांच्यावर चित्रपट बनवायला हवा'
योगाबद्दल बाबा रामदेव म्हणाले की, "माझे संपूर्ण जीवन योग आणि योगासाठी आहे. योगधर्म हा या काळातील युगधर्म आहे. त्याचबरोबर खरा मानवधर्म, राष्ट्रधर्म, सेवाधर्म, हाच परम धर्म आहे. या धर्मात सामील व्हा." दरम्यान, करनालमध्ये याआधीही योगासाठी शेकडो वर्ग भरवले जायचे, जे कोरोनानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना बाबा रामदेव म्हणाले की, योगाऐवजी उत्तम काम करणाऱ्या मनोहर लाल यांच्यावर चित्रपट बनवायला पाहिजे.