बाबा रामदेव यांनी 'ते' विधान मागे घ्यावं, फक्त स्पष्टीकरण पुरेसं नाही; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 08:12 PM2021-05-23T20:12:08+5:302021-05-23T20:13:45+5:30
बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचारांबाबत केलेल्या विधानावरुन डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना थेट पत्रच लिहिलं आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे.
ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आणि इंडियन मेडिकल असोसिएशननं बाबा रामदेव यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यासोबत बाबा रामदेव यांना कायदेशीर नोटीस देखील पाठविण्यात आली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
"संपूर्ण देशातील नागरिकांसाठी डॉक्टर्स देवदूत ठरत आहेत. ते दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत. बाबा रामदेव यांनी उपचारांसंबंधी केलेलं विधान म्हणजे कोरोना योद्धांच्या भावनांना ठेच पोहोचवणारं आहे. यासंदर्भात फक्त स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. बाबा रामदेव यांनी आपलं विधान जाहीरपणे मागे घ्यायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप
"ॲलोपॅथी उपचारांबाबत आणि डॉक्टरांबद्दलच्या विधानावरुन देशातील नागरिकांच्या भावना खूप दुखावल्या आहेत. जनतेच्या या भावनांबाबत मी तुम्हाला फोनवरही कल्पना दिली आहे. शनिवारी तुम्ही जे स्पष्टीकरण म्हणून पत्रक जारी केलं ते झालेल्या जखमांवर मलमपट्टी लावण्यासाठी पुरेसं नाही. सध्याच्या कठीण काळात ॲलोपॅथी आणि डॉक्टरांनी कोरोनातून रुग्णांना वाचवून खूप मोठं काम केलं आहे. ॲलोपॅथी औषधांमधून अनेकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळे ॲलोपॅथी औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचं तुमचं विधान अतिशय दुर्दैवी आहे. कोरोनाविरोधातील लढाई सामूहिकरित्याच लढता येईल याचं भान प्रत्येकानं बाळगायला हवं", असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.
रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या; IMA ने पाठविली कायदेशीर नोटीस
ॲलोपॅथीला दिवाळखोरी ठरवणं दुर्दैव
"कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी चिकित्सेला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोरी ठरवणं अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त १.१३ टक्के आणि बरं होण्याचं प्रमाण ८८ टक्के इतकं आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचं सर्वात मोठं योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधनं ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचविण्यासारखं आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी अजिबात संतुष्ट नाही", असं रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं आहे.