योगेंद्र यादव, भूषण यांचा नवा पक्ष
By admin | Published: January 20, 2016 03:16 AM2016-01-20T03:16:36+5:302016-01-20T03:16:36+5:30
आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे नेतेद्वय नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असून २०१७ मध्ये पंजाबमध्ये
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून हकालपट्टी झालेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे नेतेद्वय नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करीत असून २०१७ मध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवू शकतात.
आपमधून बडतर्फीनंतर उभय नेते आणि त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या स्वराज अभियानाने पंजाब विधानसभा निवडणुका लढविण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. स्वराज अभियानच्या एका ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लवकरच एक राजकीय पक्ष स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. अर्थात याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान, अभियानने खादूर साहिब विधानसभा मतदारसंघात पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत संगीतकार भाई बलदीपसिंग यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वराज अभियान ही एक अराजकीय संघटना आहे आणि आम्ही पुढील महिन्यापर्यंत नवा पक्ष स्थापन करण्याचीही शक्यता नाही. भाई बलदीपसिंग हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असून स्वराज अभियान त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल, असे या नेत्याने स्पष्ट केले.
दुसरीकडे आपने विधानसभा निवडणुकांमध्ये विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गेल्या आठवड्यातच आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात विशाल सभेला संबोधित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)