योगेश्वर दत्त राजकारणाच्या आखाड्यात गारद, काँग्रेस उमेदवाराने केले चितपट
By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 05:25 PM2020-11-10T17:25:40+5:302020-11-10T17:28:13+5:30
Yogeshwar Dutt News : २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे.
चंदिगड - २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याला राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. हरियाणामधील बरोडा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमधून योगेश्वर दत्त भाजपा उमेदवार म्हणून राजकीय आखाड्यात उतरला होता. मात्र योगेश्वर दत्तला काँग्रेस उमेदवार इंदुराज नरवाल यांनी विजय मिळवला आहे.
हरियाणामधील बरोडा विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेस उमेदवार इंदुराज नरवाल यांना ६० हजार १३२ मते मिळाली. तर भाजपा उमेदवार योगेश्वर दत्त याला ५० हजार १७६ मते मिळाली. इंडियन नॅशनल लोकदलच्या उमेदवाराला ४ हजार ९८० मते आणि लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला ५ हजार ५९५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला सुमारे १० हजार मतांनी विजय मिळाला.
बरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे योगेश्वर दत्त, काँग्रेसचे इंदुराज नरवाल. इनेलोचे जोगेंद्र मलिक, लोसुपाचे राजकुमार सैनी यांच्यासह १४ जण रिंगणात होते. येथे आज सकाळपासून मतमोजणी झाली. यामध्ये अखेर काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली.