सेवाकार्यात १ लाख कोटी रुपये गुंतविण्याची इच्छा - योगगुरू बाबा रामदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 01:02 AM2018-10-10T01:02:52+5:302018-10-10T01:04:26+5:30
योगगुरू बाबा रामदेव यांनी सेवाकार्यात १ लाख कोटी गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोग्य, शिक्षण, संशोधन व विकास आणि कृषी व पर्यावरण या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करायची आहे, असे मत त्यांनी फिक्की संस्थेच्या महिला संघटनेच्या परिषदेत व्यक्त केले.
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी सेवाकार्यात १ लाख कोटी गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोग्य, शिक्षण, संशोधन व विकास आणि कृषी व पर्यावरण या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करायची आहे, असे मत त्यांनी फिक्की संस्थेच्या महिला संघटनेच्या परिषदेत व्यक्त केले.
बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली आयुर्वेदने कृषी व खाद्यान्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच येत्या काळात कृषी व खाद्यान्न प्रक्रियेशी निगडित अधिकाधिक उत्पादने बाजारात आणले जातील. त्यासाठी आम्ही पतंजलीचे गाईचे दूधसुद्धा बाजारात आणले आहे. देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची पतंजलीची इच्छा आहे. त्याखेरीज पतंजलीला सौर क्षेत्रातसुद्धा काम करायचे आहे. पतंजलीची उलाढाल १११ टक्के वाढीसह १०,५६१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पण आमचे लक्ष्य त्याहीपेक्षा मोठे आहे. पतंजली आयुर्वेदला या क्षेत्रात जगात सर्वांत मोठे व्हायचे आहे. त्यासाठीच येत्या वर्षभरात देशभरात किमान १०० नवीन दुकाने सुरू केली जाणार आहेत.
पतंजली ही ‘धर्मदाय’ संस्थाच!
पतंजली आयुर्वेदअंतर्गत मोठी आर्थिक उलाढाल बाबा रामदेव करीत आहेत. तसे असले तरी पतंजली ही केवळ एक धर्मदाय संस्था आहे, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच व्यवसाय वाढवताना कुठल्याही स्थितीत विदेशी गुंतवणूकदारांचा पैसा घेतला जाणार नाही किंवा शेअर बाजारात जाऊन लोकांच्या निधीवर भांडवल उभे केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.