Yogi Adityanath : योगींच्या सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री?, मोदींच्या डोक्यात नवीन राजनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:06 PM2022-03-12T20:06:07+5:302022-03-12T20:10:59+5:30
राज्यातील 403 विधानसभेच्या जागांपैकी 273 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदीयोगी आदित्यनाथ यांचीच वर्णी लागणार आहे. त्यामुळे, आता या बड्या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणाला मिळणार, भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीची जोरात तयारी सुरू आहे. त्याचसोबत, यंदाच्या योगी सरकारमध्ये आणखी 2 नवे उपमुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच, उत्तर प्रदेश सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री असणार आहेत. त्यामुळे, केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात वेगळंच राजकारण असल्याचं दिसून येतंय.
राज्यातील 403 विधानसभेच्या जागांपैकी 273 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. 37 वर्षानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजपने इतिहास रचला आहे. नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वात युपीकरांनी राज्यात योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली आहे. आता, भाजप नेतृत्वाकडून युपीसाठी 4 उपमुख्यमंत्री निवडण्यात येणार असल्याचे समजते. या चारपैकी तीन चेहरे नवीन असणार आहेत. राजकीय वर्तुळात सध्या बेबी राणी मौर्य, ब्रजेश पाठक आणि स्वतंत्रदेव सिंह, केशव प्रसाद मौर्य या चार नावांची चर्चा होत आहे. त्यासोबतच योगींच्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश शर्मा यांना मंत्रिमंडळातून हटवत भाजपच्या संघटनात्मक कार्यात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. याबाबत, अद्याप पक्षाकडून अधिकृत माहिती आली नाही. रंगपंचमीनंतर योगींच्या सरकारमध्ये नवीन आमदारांना मंत्रीपद आणि खातेवाटप करण्यात येणार आहे. राजनाथसिंह यांचा मुलगा पंकज सिंह यास मंत्रीमंडळात संधी दिली जाणार असल्याची चर्चा होत आहे, ते नोएडा येथून दुसऱ्यांदा आमदार बनले आहेत. त्यासंह, असीम अरुण, नितीन अग्रवाल यांनाही मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. महेंद्र सिंह, सिद्धार्थनाथ सिंह आणि श्रीकांत शर्मा यांसारख्या आमदारांवरही मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, केशव प्रसाद मौर्य हे भाजपच्या तिकीटावर निवडणुकीत पराभूत झाले आहेत. सपाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांनी 7 हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव केला आहे. मात्र, तरीही केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळणार असल्याचे समजते.