Yogi Adityanath: सर्वसामान्यांची कामं 3 दिवसांत मार्गी लावा, CM योगींचे प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:10 PM2022-04-14T15:10:09+5:302022-04-14T15:11:25+5:30
सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कामावर हजर झाले पाहिजेत
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर, नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना ते चांगलेच एक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चेनंतर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही त्यांनी फैलावर घेतलं आहे. राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, तीन दिवसांपेक्षा अधिक काळ कुठलिही फाईल आपल्या टेबलावर पेंडिंग राहू देऊ नका, असे निर्देशच त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कामावर हजर झाले पाहिजेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. योगींनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. वेळेत हजर राहणे, विनकारण विलंब कदापी स्विकारला जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सातत्याने या गोष्टींच निरीक्षण करणे आवश्यक आहे. बेशिस्त आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही योगींनी स्पष्ट केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करा. प्रत्येक कार्यालयात नागरिक सेवा चार्ट झळकविण्यात यावा, त्याचे पालनही करण्यात यावे. कुठल्याही कार्यालयात फाइल तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहता कामा नये. कर्मचाऱ्याचा कामचुकारपणा दिसून आल्यास उत्तर द्यावं लागणार आहे. दरम्यान, मान्यता नसलेल्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतची छेडछाड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले.