योगी आदित्यनाथांनी मोडली नोएडाबद्दलची राजकीय अंधश्रद्धा, 30 वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता धसका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 04:19 PM2017-12-25T16:19:32+5:302017-12-25T16:28:27+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी नोएडा शहराला भेट देऊन त्या शहराबद्दल असलेली राजकीय अंधश्रद्धा मोडून काढली.
नोएडा - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी नोएडा शहराला भेट देऊन त्या शहराबद्दल असलेली राजकीय अंधश्रद्धा मोडून काढली. उत्तर प्रदेशातील नोएडा हे सर्वात विकसित शहर आहे. पण या शहराबद्दल उत्तर प्रदेशातील राजकारण्यांमध्ये एक मोठी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात उत्तर प्रदेशच्या एकाही मुख्यमंत्र्याने कधीही नोएडाला भेट दिली नाही. जो मुख्यमंत्री नोएडाला जाऊन येतो तो पुन्हा कधीही सत्तेवर येत नाही अशी उत्तर प्रदेशच्या राजकारण्यांमध्ये दहशत आहे.
योगींच्या आधी मुख्यमंत्री असलेले अखिलेश यादव यांनी पाचवर्षात एकदाही नोएडाचा दौरा केला नाही. त्याआधी मायावती मुख्यमंत्री असताना 2007 ते 12 दरम्यान त्या अनेकदा नोएडाला गेल्या पण 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीत या अंधश्रद्धेला बळच दिले.
नोएडाबद्दलची ही अंधश्रद्धा 1988 सालच्या जून महिन्यापासून पासून सुरु झाली. त्यावेळचे तत्कालिन मुख्यमंत्री वीर बहाद्दूर सिंह नुकतेच नोएडावरुन परतले होते. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर वीर बहाद्दूर सिंह यांची राजकीय कारकिर्द फारशी चमकली नाही.
आज नोएडामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा मार्गावरील कलकाजी मंदिर-बोटॅनिकल गार्डन उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोएडा भेटीच्या दोन दिवस आधीच शनिवारीच योगी आदित्यनाथ शहरात आले होते. सोमवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राम नाईक यांच्यासह मजेंटा मार्गाच्या उदघाटनासाठी योगी नोएडामध्ये आले. यावेळी त्यांनी शहरातील लोकांना आपण यापुढे नोएडाला भेट देत राहू असे सांगितले.
नोएडाबद्दल असलेली अंधश्रद्धा मोडून काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. सुशासनात अंधश्रद्धेला थारा नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले. योगी आदित्यनाथ आधुनिक नसल्याचे काही जणांचे मत आहे पण उत्तर प्रदेशच्या याआधीच्या मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही ते योगींनी करुन दाखवले आहे. विश्वास महत्वाचा आहे पण अंधविश्वास योग्य नसल्याचे मत मोदींनी यावेळी व्यक्त केले.