अयोध्येत आज राम रहीमचा हा रेकॉर्ड तोडणार योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 03:43 PM2017-10-18T15:43:51+5:302017-10-18T15:45:01+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करणार आहे.
अयोध्या- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करणार आहे. यासाठी यूपी सरकारकडून अयोध्येमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर जवळपास 1 लाख 71 हजार पणत्या प्रज्वलीत केल्या जाणार आहेत. हा एकप्रकारे रेकॉर्ड होऊ शकतो. याआधी सगळ्यात जास्त पणत्या लावायचा रेकॉर्ड बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याच्या नावे आहे. गिनीज बुक रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार 23 सप्टेंबर 2016 रोजी राम रहीमने हरियाणामध्ये एक लाख पन्नास हजार नऊ दिवे लावले होते. या कार्यक्रमात जवळपास 1531 लोकांनी सहभाग घेतला होता. आजतकने हे वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी संध्याकाळी चार वाजता फैजाबाद विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते अयोध्येच्या राम पार्कमध्ये पोहचणार आहेत. याचदरम्यान ते साकेतवरून शोभा यात्रेत सहभागी होणार आहेत.
5100 दिव्यांनी होणार शरयू नदीची महाआरती
15 मिनिट देवी शरयूचं पूजन आणि अभिषेक होणार असून 5100 दिव्यांनी शरयूची आरती केली जाणार आहे. महाआरतीचे मुख्य पुरोहित शशिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे. या पूजेनंतर योगी आदित्यनाथ दिपोत्सवाच्या कार्यक्रमाला जातील. या कार्यक्रमात 1 लाख 71 हजार पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत. दिवाळीत इतक्या मोठ्या प्रमाणात पणत्या लावायची ही पहिलच वेळ आहे.