UP Assembly Election 2022: भाजपाचा मास्टर प्लान! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:51 PM2022-01-12T20:51:05+5:302022-01-12T20:52:53+5:30
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ अयोध्येतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपाकडून त्यासाठीची चाचपणी सुरू असून अयोध्येचा मतदारसंघ योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निश्चित केला जात असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी योगी आदित्यनाथ गोरखपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांची एन्ट्री करण्यात आली होती. विधान परिषेदत योगींची बिनविरोधत निवड झाली होती.
योगी आदित्यनाथ यावेळी नेमकं कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. काशी (वाराणसी), अयोध्या सोबतच मथुरा विधानसभा मतदार संघाचं नाव देखील योगींसाठी घेतलं जात होतं. पण आता अयोध्या मतदार संघावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानं अयोध्येत विकास कामांना गती आल्याची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. तसंच अयोध्येत राम मंदिरसारख्या मोठ्या मुद्द्यावर निर्णय देखील आदित्यनाथ यांच्याच कार्यकाळात आला. तसंच सद्यस्थितीत राम मंदिराचं निर्माण कार्य देखील वेगानं सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्याच कार्यकाळात अयोध्येत दिप प्रज्वलनाचा रेकॉर्ड देखील करण्यात आला होता.