Yogi Adityanath : "हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:21 AM2024-05-28T10:21:31+5:302024-05-28T10:30:43+5:30
Lok Sabha Election 2024 And Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील 80 पैकी 80 जागा जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्ष करत आहे. निवडणुकीनंतर पक्ष योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवेल, असे विरोधकांचं म्हणणं आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 80 जागा जिंकण्याचा दावा भारतीय जनता पक्ष करत आहे. निवडणुकीनंतर पक्ष योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवेल, असे विरोधकांचं म्हणणं आहे. आजतकशी खास संवाद साधताना मुख्यमंत्री योगी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी एक योगी आहे. सत्तेसाठी नाही तर पक्षाची मूल्य आणि तत्त्वांसाठी काम करणं हे माझं प्राधान्य आहे" असं योगींनी म्हटलं आहे.
400 पारवर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, "हा फक्त विश्वास नसून हे होणार आहे. हा देशाचा मंत्र बनला आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, देशातील प्रत्येक वर्गाने, प्रत्येक समुदायाने ही घोषणा आपल्या जीवनाचा एक भाग बनवली आहे, मोदीजींची लोकप्रियता, त्यांनी गेल्या 10 वर्षात केलेले कार्य, हे सर्व लक्षात घेऊन, सुरक्षा, आदर, स्थानिक पातळीवरील विकास आणि गरिबांचे कल्याण या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जनता जनार्दन या घोषणेला सत्यात उतरवत आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा मोदी सरकार आणि एनडीएसोबत 400 चं लक्ष्य गाठू."
"विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही"
निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या दाव्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही. ते आपसात फूट पाडण्याचं राजकारण करत आहेत. असो त्यांनी नेहमीच फूट पाडली आहे. आधी काँग्रेसने देशाची फाळणी केली, नंतर प्रदेश, भाषेच्या आधारावर विभागणी केली आणि या निवडणुकीत जातीच्या आधारावर विभाजन केलं."
"हा विरोधकांचा प्रोपगंडा, मी एक योगी आहे"
"हा विरोधकांचा एक प्रोपगंडा आहे. असो, मी एक योगी आहे आणि माझ्यासाठी ती सत्ता नसून पक्षाची मूल्य आणि तत्त्व, ज्या मूल्यांसाठी आणि आदर्शांसाठी आपण राजकारण आणि सार्वजनिक जीवनात आलो आहोत, त्यासाठी काम करणं ही आपली प्राथमिकता आहे. केजरीवालजी, तुम्ही सत्तेसाठी तुमच्या तत्त्वांचा त्याग केला आहे. तत्त्वांचा विचार केला तर एका जन्मात नाही तर 100 जन्मात आम्ही ती सत्ता नाकारू. नेशन फर्स्ट ही आमची थेरी आहे, आम्ही पक्षाची मूल्य आणि तत्त्वांसाठी काम करू."
"आम्ही जिंकू, 80 बनेगा आधार, अबकी बार 400 पार"
"आम्ही काशी जिंकू हे ते मान्य करत आहेत. यानंतर ते गोरखपूर म्हणतील, मग ते मैनपुरी, कन्नौज, आझमगड म्हणतील, जेव्हा हे सर्व भाजपाच्या वाट्याला येतील आणि एनडीएचा भाग असतील, तेव्हा स्वाभाविकपणे 80 पैकी 80 जागा भाजपा जिंकेल. गेल्या वेळीही आम्ही कन्नौज जिंकलं होतं आणि यावेळीही आम्ही जिंकू, आम्ही मागच्या वेळीही आझमगड जिंकलो होतो आणि यावेळीही जिंकू. मैनपुरीमध्येही भाजपा जिंकणार... 80 बनेगा आधार, अबकी बार 400 पार" असं योगींनी म्हटलं आहे.