उत्तर प्रदेशात कोरोना रुग्ण सापडल्यास २० घरे सील; योगी सरकारची नवी नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:18 AM2021-04-05T11:18:16+5:302021-04-05T11:19:47+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये नवे निर्बंध, नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
प्रयागराज: देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल एक लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक राज्यांमध्ये नवे निर्बंध, नियमावली जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, एक कोरोना रुग्ण आढळून आल्यास आजूबाजूची घरे सील करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. (yodi adityanath declared new guidlines in the state)
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण वाढवण्यात आले आहे. तसेच जनजागृतीचेही प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. मास्क घालणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. योगी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना लस घेतली असून, जनतेने काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर
योगी सरकारची नवी नियमावली
कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या परिसरातील आजूबाजूची २० घरे कंन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात येतील. तसेच ही २० घरे सील केली जातील. कोरोनाचा प्रादुर्भाव लोकांना होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६० घरे सील करण्यात येणार आहेत. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ४ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात १९ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत ०३ कोटी ५४ लाख १३ हजार ९६६ चाचण्या करण्यात आल्या असून, रविवारी ७८ हजार ९५९ नमुने आरटी पीसीआर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले, अशी माहिती अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.
‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती
दरम्यान, देशातील कोरोना परिस्थिती अशीच कायम राहिली तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या १.४ कोटींवर जाईल असा अंदाज झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान बंगळुरू येथील IISC वर्तवला आहे.