दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:11 IST2021-06-09T13:04:28+5:302021-06-09T13:11:26+5:30
भाजप नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा

दिल्लीला जाणार का? पंतप्रधान होणार का? योगी आदित्यनाथांनी सांगितल्या 'महत्त्वाकांक्षा'
लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल तीनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षानं २०२२ साठी आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये फारसं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसू लागलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र दिल्लीतील नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद
योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे पक्षांतर्गत संघर्ष वाढल्याचं बोललं जात आहे. याबद्दलच्या प्रश्नांना खुद्द योगींनीच एका मुलाखतीतून उत्तरं दिली आहेत. माझ्या मनात कोणत्याही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाहीत, असं योगी म्हणाले. 'मी खासदार होतो, त्यावेळीही माझ्या कोणत्याही महत्त्वाकांक्षा नव्हत्या आणि आजही नाहीत. मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे,' असं योगींनी सांगितलं. ते टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत
भाजपकडे विकासाची दृष्टी आहे. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी आम्ही कार्यरत आहोत. पंतप्रधान मोदींच्या अभियानात आम्ही काम करत आहोत, असं योगी पुढे म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून राज्य प्रगतीपथावर आहे. राज्याचा विकास होतोय यापेक्षा मोठा दुसरा आनंद असू शकत नाही. माझ्या कोणत्याही राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाहीत, असं योगींनी स्पष्ट केलं आहे.
भाजप नेतृत्त्व आणि योगी आदित्यनाथ यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न योगींनी केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. या निवडणकीत आम्ही दोन तृतीयांश जागा जिंकून सत्ता कायम ठेवू, असा विश्वास योगींनी व्यक्त केला.