योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:17 PM2022-03-24T18:17:08+5:302022-03-24T18:17:52+5:30
Yogi Adityanath Oath Ceremony: आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.
लखनऊ : योगी आदित्यनाथ यांची आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ज्येष्ठ नेते सुरेश खन्ना यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. लखनऊ येथील लोकभवनात झालेल्या या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक अमित शाह, रघुबर दास आणि भाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान हेही उपस्थित होते.
आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता योगी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. याआधी योगी आदित्यनाथ गुरुवारी दिल्लीत पोहोचले होते. येथे त्यांनी सरकार स्थापनेबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. तसेच, भाजप केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवू शकते. जवळपास 46 मंत्री शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
माननीय केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah जी का उत्तर प्रदेश की ऐतिहासिक व पावन धरा पर हार्दिक स्वागत एवं अभिनंदन... pic.twitter.com/THC8jhQCUy
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 24, 2022
दरम्यान, योगी सरकारच्या (Yogi Government) दुसऱ्या टर्मचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उद्योगपती तसेच साधू संतांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचे (Bollywood) सिनेस्टारही उपस्थित राहणार आहेत.
उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रण
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्याशिवाय विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आघाडीचे उद्योगपती आणि 49 कंपन्यांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, अंबानी ग्रुपचे नीरज अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला आणि अदानी ग्रुपचे गौतम अदानी यांचाही समावेश असेल.
भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची यादी...
शिवराज सिंह चौहान – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर- हरयाणाचे मुख्यमंत्री
पेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
एम एन वीरेन सिंग – मणिपूरचे मुख्यमंत्री
जय राम ठाकूर - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
विप्लब देवजी - त्रिपुराचे मुख्यमंत्री
प्रमोद सावंत – गोव्याचे मुख्यमंत्री
हिम्मत बिस्वा शर्मा- आसामचे मुख्यमंत्री श्री
बसवराज बोम्मई - कर्नाटकचे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल - गुजरातचे मुख्यमंत्री
पुष्कर सिंह धामी – उत्तराखंडचे मुख्यमंत्री
तारकेश्वर सिंह - बिहारचे उपमुख्यमंत्री
रेणू देवी - बिहारच्या उपमुख्यमंत्री
वाईपॅटन - नागालँडचे उपमुख्यमंत्री
चोनामीन - अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री
जिष्णु देव वर्मा जी- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री