Yogi Adityanath : योगींची मोठी घोषणा; 3 महिन्यांसाठी पुन्हा मोफत रेशन योजना लागू, 15 कोटी लोकांना मिळणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 12:10 PM2022-03-26T12:10:17+5:302022-03-26T12:11:10+5:30
Yogi Adityanath : योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
लखनऊ : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Adityanath Government) मोफत रेशन योजनेचा लाभ वाढवण्याचा निर्णय घेतला. यूपी सरकारच्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीच्या पहिल्या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रसार माध्यमांना दिली. योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही मोफत रेशन योजनेला पुढील 3 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 15 कोटी लोकांना होणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा पहिला निर्णय घेतला आहे. याची माहिती देण्यासाठी मी स्वतः तुमच्यामध्ये आलो आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, यूपी मोफत रेशन योजनेंतर्गत, लाभार्थी कुटुंबांना डाळी, साखर, खाद्यतेल, मीठ यांसारख्या मोफत अन्नपदार्थांसह 35 किलो रेशन घेण्याचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचा लाभ देण्यात येत होता. यानंतर योगी सरकारने ही योजना मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता यूपीच्या नवीन मंत्रिमंडळाने या योजनेला तीन महिन्यांसाठी म्हणजेच जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शिधापत्रिकाधारकांना मिळतो योजनेचा लाभ
यूपीतील शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामध्ये गहू, तांदूळ तसेच इतर वस्तूंचा समावेश होता. योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना गहू, तांदूळ याबरोबरच साखर, डाळी, तेलाची पाकिटे, मिठाची पाकिटे आदींचे वाटप करण्यात येत आहे. गहू-तांदूळ योजनेंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 35 किलो धान्य दिले जात आहे. याशिवाय, 1 लिटर तेलाचे पाकीट, 1 किलो डाळ, 2 किलो साखर आणि एक किलो मीठही दिले जात आहे.