BJP PM Candidate: Narendra Modi नंतर पंतप्रधानपदासाठी Yogi Adityanath सांगणार का दावा? त्यांनी स्वत:च दिलं स्पष्ट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:08 AM2023-02-04T11:08:17+5:302023-02-04T11:09:03+5:30
२०२४च्या निवडणुकीत काय घडेल याचाही व्यक्त केला अंदाज
Yogi Adityanath Narendra Modi, BJP PM Candidate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाकडूनपंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे. काही जण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तर काही जण यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान मोदी यांच्यानंतरचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणतात. अनेक ठिकाणी भाजपाच्या अन्य मुख्यमंत्र्यांचीही चर्चा आहे. पण या दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएम मोदींनंतर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार की नाही, यावर स्पष्ट उत्तर दिले आहे. एका खाजगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानपदाच्या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तसेच, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उत्तर प्रदेशात २०१९ पेक्षाही जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
सीएम योगी पंतप्रधानपदाचे दावेदार?
"पंतप्रधान मोदी हे देशाचे एक बलशाली नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला नवी ओळख मिळाली. कोणत्याही निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचे नाव मोठे असते. २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या कार्यशैलीचा फायदाच झाला आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. मी कोणत्याही पदासाठीचा दावेदार नाही. मला सध्या फक्त उत्तर प्रदेशात राहण्याची इच्छा आहे," असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टपणे म्हणाले.
मुलाखतीत CM योगी आदित्यनाथ यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्नही विचारण्यात आले होते. २०२४ मध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशात भाजपा जास्त जागा जिंकेल. भाजपाचेच सरकार येईल. पुढील निवडणुकीत भाजपला लोकसभेच्या ३०० ते ३१५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
रामचरितमानस वादावर योगींचा टोला
"हा वाद विकासापासून लक्ष हटवण्यासाठी होत आहे. पण समाजात तेढ पसरवण्यात त्यांना यश मिळणार नाही. त्यांचे वास्तव समाजाला कळले आहे. हिंदुत्व हे सौम्य किंवा कठोर नसते. ते फक्त हिंदुत्व असते. हिंदू धर्म हा भारतातील जीवन जगण्याचा मूलभूत मार्ग आहे," असे रामचरितमानसच्या चौपईच्या वादावर योगी म्हणाले.