"पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार, संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो"; भाजपाच्या मंत्र्याचं अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 04:31 PM2022-10-27T16:31:47+5:302022-10-27T16:43:09+5:30
Gulab Devi And Narendra Modi : गुलाब देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पण हे करताना त्यांनी एक अजब विधान केलं आहे.
योगी आदित्यनाथ सरकारमधील माध्यमिक शिक्षण मंत्री गुलाब देवी (Gulab Devi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. पण हे करताना त्यांनी एक अजब विधान केलं आहे. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी हे एक असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांची इच्छा असेल तर ते आयुष्यभर पंतप्रधान राहू शकतात. ते देवाचा अवतार आहेत. त्यांना जसं हवं तसं ते करतात हवं. संपूर्ण भारत त्यांचं ऐकतो. यापेक्षा मोठी ओळख कोणती असू शकते? असं म्हटलं आहे.
मंत्री गुलाब देवी संभलच्या चंदौसी विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. "नरेंद्र मोदी काही लोकांमुळे पंतप्रधानपदावरून पायउतार होणार नाहीत. दुसरं कोणी येणार नाही. त्यांना जेव्हा जसं हवं तेव्हा ते तसं करतात. त्यांना हवे असेल तर ते घंटा वाजवतात, त्यांना हवे असल्यास ते मजीरा वाजवतात. ते काहीही करू शकतात" असं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे.
"पंतप्रधान मोदीजी एक अवतार”
कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांनी मंत्र्यांना विचारले होते की, देशात अल्पसंख्याक पंतप्रधान होण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यावर गुलाब देवी म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. येथे कोणीही भाषणबाजी करू शकतो, कोणतेही बंधन नाही. याला आपण फारसे महत्त्व देत नाही. पंतप्रधान मोदीजी एक अवतार आहेत. ते विलक्षण प्रतिभेचे आहेत.
गुलाब देवी चार वेळा आमदार
चंदौसी विधानसभेतून गुलाब देवी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वीच्या योगी सरकारमध्ये त्या राज्यमंत्रीही होत्या. यावेळी त्यांना माध्यमिक शिक्षण मंत्री करण्यात आले आहे. पेशाने शिक्षिका असलेल्या गुलाब देवी 1991 पासून भाजपामध्ये आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"