Yogi Adityanath: 200 हून अधिक VVIP, सोनिया-अखिलेश यांनाही निमंत्रण; अशी आहे योगींच्या शपथविधीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:18 PM2022-03-16T19:18:21+5:302022-03-16T19:27:34+5:30
योगी आदित्यनाथांचा 21 मार्च रोजी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी होऊ शकतो.
लखनौ: उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. होळीनंतर 21 मार्चला ते शपथ घेऊ शकतात. हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे.
हजारो लोक सोहळ्यात येणार
या शपथविधी सोहळ्याला 45 हजार लोक उपस्थित राहू शकतील असे सांगण्यात येत आहे. 200 हून अधिक व्हीव्हीआयपींची यादीही तयार करण्यात आली आहे. योगींच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. या सर्वांशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा लाभ घेतलेल्या राज्यभरातील लाभार्थींचाही समावेश करण्यात येणार आहे.
शपविधीच्या जागेवरुन विरोधकांचा टोला
मात्र या सोहळ्यापूर्वीच शपथविधीच्या 'जागे'वरुन राजकारण सुरू झाले आहे. समाजवाद्यांनी बांधलेल्या स्टेडियमशिवाय शपथविधीसाठी दुसरी जागा मिळाली नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे. ज्या ठिकाणी योगींचा शपथविधी होत आहे, ते स्टेडियम अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात बांधण्यात आले होते. बाहेरुन मुघल वास्तुकला असलेले आणि आतून खेळासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले हे स्टेडियम आहे.
योगींनी स्टेडीयमचे नाव बदलले
2018 मध्ये योगी सरकारने या स्टेडियमचे नाव माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केले. येथे एक टी-20 सामनाही आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियमची क्षमता सुमारे 50 हजार असल्याचे सांगितले जाते. पण क्रिकेटचे हे स्टेडियम आता योगींच्या दुसऱ्या कार्यकाळाचे साक्षीदार होणार आहे. येथे मुख्यमंत्री योगी केवळ शपथ घेणार नाहीत, तर त्यांचे अन्य संभाव्य मंत्रीही या व्यासपीठावरुन शपथ घेतील.
दिल्लीत भाजपची बैठक
त्या शपथविधीपूर्वी दिल्लीत नव्या सरकारबाबत मंथन सुरू आहे. दिल्ली भाजप कार्यालयात आज एक मोठी बैठक झाली. मुख्यमंत्री योगी यांच्यापासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित राहिले आहेत. सर्वांनी नवीन सरकार आणि त्यांच्या संभाव्य मंत्र्यांबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे.