Yogi Adityanath Oath Ceremony : योगींनी स्वतः मुलायम, अखिलेश अन् मायावतींना केला फोन; शपथविधी सोहळ्याचं दिलं निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:36 AM2022-03-25T10:36:49+5:302022-03-25T11:22:21+5:30
Yogi Adityanath Oath Ceremony : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज दुपारी 4 वाजता योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.
लखनऊ : राजधानी लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज संध्याकाळी 4 वाजता योगी आदित्यनाथउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी कार्यक्रमाला भाजपशासित 12 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. यानंतर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. तसेच, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांना स्वत: फोन करून शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. याशिवाय, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वड्रा, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
उद्योग आणि फिल्म जगतातील सेलिब्रिटीही येणार
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहू शकतात. मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योगपतींना शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. तसेच, काही बॉलिवूड कलाकारांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, कंगना रणौत, अजय देवगण, बोनी कपूर, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
साधू-संतांना सुद्धा निमंत्रण
याचबरोबर, योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपशासित मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीच्या लोकांसह 50 पेक्षा अधिक संतांना निमंत्रण दिले आहे. तसेच, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वरिष्ठ सदस्यांसह प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची यादी...
शिवराज सिंह चौहान – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर- हरयाणाचे मुख्यमंत्री
पेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
एम एन वीरेन सिंग – मणिपूरचे मुख्यमंत्री
जय राम ठाकूर - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
विप्लब देवजी - त्रिपुराचे मुख्यमंत्री
प्रमोद सावंत – गोव्याचे मुख्यमंत्री
हिम्मत बिस्वा शर्मा- आसामचे मुख्यमंत्री श्री
बसवराज बोम्मई - कर्नाटकचे मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल - गुजरातचे मुख्यमंत्री
पुष्कर सिंह धामी – उत्तराखंडचे मुख्यमंत्री
तारकेश्वर सिंह - बिहारचे उपमुख्यमंत्री
रेणू देवी - बिहारच्या उपमुख्यमंत्री
वाईपॅटन - नागालँडचे उपमुख्यमंत्री
चोनामीन - अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री
जिष्णु देव वर्मा जी- त्रिपुराचे उपमुख्यमंत्री