मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना डच्चू देणार? भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान अन् चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:11 PM2021-06-16T16:11:53+5:302021-06-16T16:15:51+5:30
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? भाजपच्या नेत्यानं दिलं सूचक उत्तर
लखनऊ: पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे. देशातील सर्वात मोठं राज्य आणि सर्वाधिक खासदार निवडून देणारा प्रदेश अशी उत्तर प्रदेशची ओळख असल्यानं येथील निवडणूक पुढील लोकसभेची सेमी फायनल मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? योगी आदित्यनाथांना कायम ठेवणार की नवा चेहरा दिला जाणार?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भाजपचं नवं मिशन! पंतप्रधान मोदी 'त्या' दाम्पत्याला देणार 'स्पेशल गिफ्ट'; छोट्यांना मिळणार मोठी संधी
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना पुढील निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र मौर्य यांनी याबद्दल स्पष्ट उत्तर देणं टाळलं. मौर्य यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण याविषयी थेट भाष्य करण टाळलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मौर्य यांनी योगी आदित्यनाथ यांचं नाव स्पष्टपणे घेतलं नाही. 'सध्या योगी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण असणार, अध्यक्ष कोण होणार हे पक्षाचं नेतृत्व ठरवतं. आतापर्यंत सगळे निर्णय केंद्रानं घेतले आहेत. यापुढेही त्यांच्याकडूनच निर्णय घेतले जातील. निवडणूक होईल, निकाल येईल, बैठक होईल. त्यात मुख्यमंत्री ठरेल,' असं मौर्य यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात योगींचे स्थान धोक्यात? २०२२ मध्ये भाजपाचा चेहरा कोण असेल; उपमुख्यमंत्र्यांनी दिले असे संकेत, म्हणाले...
आसाम मॉडेलच्या प्रश्नालादेखील थेट उत्तर नाही
सध्या देशात आसाम मॉडेलची चर्चा आहे. आसाममध्ये भाजपनं सत्ता राखल्यानंतर आधीच्या मुख्यमंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी हिमंत बिस्व सरमा यांना संधी देण्यात आली. उत्तर प्रदेशातही असंच होणार का, असा प्रश्न मोर्य यांना विचारण्यात आला. त्यावर केंद्र निर्णय घेईल, असं उत्तर त्यांनी दिलं.