Yogi Adityanath Oath Ceremony: म्हणून योगी सरकारमधील एक उपमुख्यमंत्री भाजपाने बदलला, समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:00 PM2022-03-25T20:00:11+5:302022-03-25T20:01:49+5:30
Yogi Adityanath Oath Ceremony: योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही मोठे फेरबदलही करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीच्या सरकारमध्ये असलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एका उपमुख्यमंत्र्याचा पत्ता कट करण्यात आला असून, त्याजागी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभेचे निकाल लागून जवळपास पंधरवडा उलटल्यानंतर आज उत्तर प्रदेशमध्येयोगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी पार पडला. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही मोठे फेरबदलही करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीच्या सरकारमध्ये असलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एका उपमुख्यमंत्र्याचा पत्ता कट करण्यात आला असून, त्याजागी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत संतुलन साधण्यासाठी ओबीसी चेहरा म्हणून केशव प्रसाद मौर्य आणि ब्राह्मण चेहरा म्हणून दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले होते. मात्र यावेळी मंत्रिमंडळ तयार करताना दिनेश शर्मांच्या ऐवजी ब्रजेश पाठक यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ब्रजेश पाठक हे बसपा सोडून भाजपामध्ये आले होते. तसेच त्यांनी लखनौ मध्य विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी कॅबिनेटमंत्रिपद मिळवले होते. दरम्यान, आता भाजपा पुन्हा सत्तेत येताच ब्रजेश पाठक यांना बढती देऊन थेट उपमुख्यमंत्रिपदावर नियुक्त करण्यात आले आहे.
ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्री करण्यामागे भाजपाची खास रणनीती आहे. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे योगींच्या पहिल्या कार्यकाळात ते ब्राह्मणविरोधी असल्याचे चित्र विरोधकांकडून निर्माण करण्यात येत होते. मात्र हा दावा खोडून काढण्यात दिनेश शर्मा अपयशी ठरले. तसेच त्यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणात स्वत:ला ब्राह्मणांचा नेता म्हणून स्थापित करता आले नाही. त्यामुळे भाजपाला उत्तर प्रदेशात प्रभावी चेहरा असलेल्या ब्राह्मण नेत्याचा शोध होता. त्यातूनच ब्रजेश पाठक यांचे नाव समोर आले.
ब्रजेश पाठक यांनी सुरुवातीपासूनच स्वत:ला ब्राह्मण नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता. २०१७ मध्ये योगी सरकार बनल्यावर उंचाहार विधानसभा क्षेत्रामधील आपटा गावामध्ये पाच ब्राह्मणांची जाळून हत्या करण्यात आली होती, त्याविरोधात ब्रजेश पाठक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे संबंधित आरोपींवर कारवाई झाली होती.
तसेच बिकरू कांडातील आरोपी विकास दुबे याचं एन्काऊंटर करण्यात आल्यावर योगी सरकारवर टीका झाली होती. योगी आदित्यनाथ यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ब्रजेश पाठक यांनी योगी सरकारची बाजू प्रखरणे मांडली. तसेच लखीमपूरच्या तिकुनिया येथे झालेल्या घटनेनंतरही ते या घटनेत मृत्यू झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या दहाव्याला गेले होते. त्यामुळे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना त्यांच्यात प्रभावी ब्राह्मण नेता दिसला आणि त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर नियुक्ती झाली.