योगी आदित्यनाथांनी यूपीला पाकिस्तान होण्यापासून वाचवलं - साध्वी प्राची
By admin | Published: April 3, 2017 02:14 PM2017-04-03T14:14:48+5:302017-04-03T14:24:23+5:30
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यामुळे उत्तर प्रदेश ‘दुसरं पाकिस्तान’ होण्यापासून वाचला आहे, असे विधान साध्वी प्राची यांनी केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणा-या साध्वी प्राची यांनी पुन्हा केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यामुळे उत्तर प्रदेश ‘दुसरं पाकिस्तान’ होण्यापासून वाचला आहे, असे विधान साध्वी प्राची यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी प्राची म्हणाल्या की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी केवळ जनतेमध्ये आनंद आणि उत्साहच निर्माण केला नसून राज्याला दुसरे पाकिस्तान होण्यापासून बचावले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातील कामांच्या चौकशीचे योगी आदित्यनाथ यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. योगींच्या या निर्णयाचं साध्वी प्राचींनी कौतुकही केलं आहे. तत्कालीन यादव सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी झाल्यास लवकरच सत्य समोर येईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. शिवाय, होणा-या चौकशीमुळे समाजवादी पक्षाची झोपच उडेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
साध्वी प्राची नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर त्यांनी बसच्या सर्वेसर्वा मायावती यांना टार्गेट करत त्या वेड्या असल्याची टीका केली होती. निवडणुकांमध्ये दणदणीत पराभव झाल्यानंतर मायावती यांनी ईव्हीएममध्ये गौंडबंगाल असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना साध्वी प्राची यांनी मायावती यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मंत्री आणि नेतेमंडळींना वाद निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ न देण्याचं आवाहन केलं होतं.