'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 08:26 PM2018-06-25T20:26:44+5:302018-06-25T20:33:13+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संतांशी संवाद
अयोध्या : थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. महंत नृत्यगोपाल दास यांच्या जन्मदिनानिमित्त अयोध्येत संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना आदित्यनाथ यांनी संत समुदायाला धीर बाळगण्याचं आवाहन केलं. काही दिवस संयम बाळगा. प्रभू रामाची कृपा झाल्यावर राम मंदिराची उभारणी होईल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं.
राम मंदिराचा प्रश्न नक्की सुटेल. संत समुदायानं थोडा संयम बाळगावा, असं योगी आदित्यनाथ संतांशी संवाद साधताना म्हणाले. 'जे लोक राम जन्मभूमी आंदोलनाला विरोध करायचे, त्यांच्या तोंडून आता मंदिराचा विषय निघतो. हा एक कट असू शकतो. त्यामुळे आपण सतर्क राहायला हवं,' असं आदित्यनाथ यांनी म्हटलं. 'राम मंदिराच्या उभारणीबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये. आपल्याला घटनेच्या मर्यादेत राहून मंदिर बांधायचं आहे. त्यामुळे संतांनी थोडं धीरानं घ्यावं,' असं योगी म्हणाले.
संतांशी संवाद साधताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'आज राम मंदिराबद्दल बोलणाऱ्या लोकांनी कधीकाळी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या होत्या,' अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. गेल्या 15 वर्षांमध्ये किती मुख्यमंत्री अयोध्येत आले, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारांनी अयोध्येच्या विकासासाठी काहीही केलं नाही, असं योगी म्हणाले. आपलं सरकार राम जन्मभूमीच्या विकासासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.