योगी आदित्यनाथ यांना अमित शाहांमध्ये दिसते या ४ महापुरुषांची छाप, सर्वांसमोर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 03:01 PM2023-02-11T15:01:27+5:302023-02-11T15:02:02+5:30
Yogi Adityanath & Amit Shah: योगी आदित्यनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वावर आचार्य चाणक्य, आदिगुरू शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसून येते
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. योगींनी अमित शाह यांच्याबाबत स्तुतिसुमने वाहिली आहेत. योगी आदित्यनाथ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वावर आचार्य चाणक्य, आदिगुरू शंकराचार्य, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसून येते.
योगी आदित्यनाथ यांनी हे विधान यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०२३ मध्ये उद्योगपतींना संबोधित करताना केले आहे. देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी लखनौमध्ये तीन दिवसीय समिटचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातूम उत्तर प्रदेशमध्ये २५ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान या समिटमधील कार्यक्रमात योगी आदित्यनाथ म्हणाले की, अमित शाह यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आचार्य चाणक्यांच्या कुशल संघटनकर्त्याचे गुण, भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेचे उद्घोषक आदिगुरू शंकराचार्य यांची साधनाशक्ती, स्वातंत्र्यवीर सावररकांच्या देशभक्तीचं तेज आणि अंत्योदय, अमृतकाळाच्या विकासयात्रेचे व्हिजन असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाच्या गुणांचे समायोजन दिसते.
दरम्यान, अमित शाह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आहे. राज्यामध्ये गुंतवणूक आणि उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये व्यापक बदल झाला आहे. तो संपूर्ण देशासाठी शुभ आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होत नाही, तोपर्यंत आपला भारत देश खूप पुढे जाऊ शकणार नाही.