मुख्यमंत्री योगींनी दया दाखवली, चिमुकलीच्या वडिलांची सुटका अन् दिवाळी गिफ्टही दिलं
By महेश गलांडे | Published: November 14, 2020 02:37 PM2020-11-14T14:37:30+5:302020-11-14T14:39:07+5:30
बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर सोडण्यात आले.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील फटाके विक्रेत्याच्या मुलाचा आवाज अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचला. मुलीच्या विनवणी आणि विनंतीवरुन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फटाके विक्रेत्याची सुटका झाली. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलीचे घर गाठून तिला व तिच्या वडिलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, मिठाईही खाऊ घातली.
बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथे शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर सोडण्यात आले. भाजपा नेते शलभ मनी त्रिपाठी यांनी यासंदर्भातील ट्विट करुन माहिती दिली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत केवळ फटाके विक्रेत्याची सुटकाच केली नाही, तर फटाके विक्रेत्याच्या घरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिठाई घेऊन पाठवले. या अधिकाऱ्यांनी पीडित वडिलांच्या चिमुकल्या मुलीला स्वत:च्या हाताने मिठाई भरवली. तसेच, दिवाळीचे गिफ्टही देण्यात आले. तसेच, संबंधित दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
माननीय मुख्यमंत्री योगीजी ने बुलंदशहर की घटना को बेहद संवेदनशीलता से लेते हुए ना सिर्फ पटाखा कारोबारी को तत्काल रिहा कराया बल्कि वरिष्ठ अधिकारियों के हाथों उनके व उनकी मासूम बेटी के लिए दीपावली के उपहार व मिठाइयां भी भिजवांईं, दोषी पुलिसकर्मी के खिलाफ सख़्त कार्रवाई कर दी गई है। pic.twitter.com/J1VtZgw9hI
— Shalabh Mani Tripathi (@shalabhmani) November 13, 2020
बुलंदशहरच्या खुर्जा मुंडाखेडा येथील ही घटना आहे. एनजीटीच्या आदेशानुसार शुक्रवारी 6 फटाके विक्रेत्यांना पोलिसांनी खुलेपणाने फटाके विकत असल्यामुळे अटक केली होती. त्यासोबतच सर्व दुकानदारांचे फटाकेही जप्त करण्यात आले होते. त्यावेळी, काही दुकानदारांनी पोलिसांसोबत धक्काबुक्कीही केली. दरम्यान, एका दुकानदारास पोलीस ठाण्यात नेत असताना, त्या फटाके विक्रेत्याच्या मुलीने रडायला सुरुवात केली. तसेच, माझ्या वडिलांना सोडून द्या, अशी विनवणीही पोलिसांसमोर केली, हात जोडले डोकंही टेकलं. मात्र, पोलिसांनी त्या मुलीच्या विनवणीला न जुमानता फटाके विक्रेत्यास पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच, माध्यमांमध्येही झळकला होता. त्यानंतर, खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मुलीच्या वडिलांना सोडून देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, मुलीच्या वडिलांची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी त्रिपाठी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, संवेदनशीलतेनं काम करण्याचं सूचवलं आहे. त्यामुळे, रात्रीच सर्व फटाका विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे बजावल्याचे त्रिपाठी यांनी म्हटलं.