Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:56 AM2022-01-23T11:56:15+5:302022-01-23T12:21:04+5:30

UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे.

yogi adityanath take a dig on akhilesh yadav and samajwadi party for terrorist cases withdrawn, up election 2022 | Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

Yogi Adityanath : समाजवादी पार्टी माफिया आणि दहशतवाद्यांची समर्थक, योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

Next

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारादरम्यान नेत्यांच्या भाषणबाजीने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे.

यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले आहे. '2017 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन होताच आम्ही तीन गोष्टी केल्या, ज्यात बेकायदेशीर कत्तलखाने बंद करणे, मुलींच्या सुरक्षेसाठी अँटी रोमियो पथक तयार करणे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे यांचा समावेश होता. तसेच 2012 मध्ये समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वप्रथम श्री रामजन्मभूमीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्यात आले होते, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर टीका केली. 

याचबरोबर, जे फुकटात वीज देण्याचे बोलतात त्यांनी उत्तर प्रदेशला अंधारात टाकले. त्यांच्या काळात फक्त अंधार होता, जे उरले होते, ते दंगली आणि कर्फ्यू पूर्ण करत होते. जेव्हा वीज दिली जात नाही, तेव्हा 'फुकट' काय देणार? असा सवाल करत आदित्यनाथ योगी यांनी समाजवादी पार्टीवर हल्लाबोल केला. याआधी शनिवारी आदित्यनाथ योगी म्हणाले होते की, 10 मार्चला समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवासाठी सज्ज राहावे. इतकेच नाही तर याआधी आदित्यनाथ योगी यांनी अनेकवेळा समाजवादी पार्टीला माफिया आणि दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचे म्हटले आहे. 

'कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होते'
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी बुलंदशहर येथे सांगितले होते की, भाजपा सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. ते म्हणाले की, समाजवादी पार्टीने गुन्हेगारांना उमेदवार घोषित करून 'विनाशाची यादी' जारी केली आहे. कैरानाच्या माध्यमातून ते येथे काश्मीर बनवण्याचे स्वप्न पाहत होते. आम्ही अशा घटकांना सांगितले आहे - काश्मीर आता स्वर्ग बनत आहे आणि पश्चिम उत्तर प्रदेश विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.
 

Web Title: yogi adityanath take a dig on akhilesh yadav and samajwadi party for terrorist cases withdrawn, up election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.