योगी आदित्यनाथ हातात झाडू घेऊन करणार ताजमहालची सफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:28 AM2017-10-24T10:28:33+5:302017-10-26T13:16:47+5:30
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत.
आग्रा - भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. यावेळी 500 भाजपा कार्यकर्ता योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जवळपास 30 मिनिटे ताजमहालमध्ये घालवणार आहेत. यानंतर जवळच असणा-या शाहजहान पार्कात ते जातील. तिथे गेल्यानंतर शाहजहान आणि मुमताज यांच्या थडग्याजवळ अर्धा तास घालवण्यात येईल. जिल्हाधिकारी गौरव दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मुख्यमंत्री 26 ऑक्टोबर रोजी आग्राला जाणार आहेत. अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासोबतच ताजमहाल आणि जवळपास असणा-या परिसराची पाहणी यावेळी केली जाईल. यासाठी आम्ही संपुर्ण व्यवस्था करत आहोत'.
ताजमहालवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या आग्रा दौ-याची घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने या अर्थसंकल्पात ताजमहालला सांस्कृतिक वारसा स्थळांच्यायादीत समाविष्ट केले नव्हते. त्यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास नकार दिला होता. ताजमहल हा एका इमारतीशिवाय काहीही नाही, असे ते म्हणाले होते.
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली होती. ताजमहाल कोणी बांधला ? कशासाठी बांधला ? हे महत्वाचे नाही. ताजमहाल भारतीय मजुरांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे. त्यामुळे ताजमहाल नि:संशय भारतीयच आहे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. ताजमहाल भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत नाही. 'ताजमहाल बांधणा-यांनी उत्तर प्रदेश आणि हिंदुस्थानातील सर्व हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम केलं होतं. ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग आहे असे संगीत सोम म्हणाले होते.
ताजमहालसाठी १५६ कोटी
उत्तर प्रदेशच्या निर्णयावर जोरदार टीका सुरू होताच, पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी ताजमहल व त्याच्याशी निगडित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकार प्रतिबद्ध असल्याचे सांगितले होते. ताजमहल आणि आग्य्राच्या विकासाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे प्राधान्य असेल, असे त्या म्हणाल्या, तसेच ताजमहल वा परिसराच्या विकासासाठी १५६ कोटी रुपयांची योजना केली आहे. ते काम तीन महिन्यांत सुरू होईल, असा खुलासाही त्यांनी केला होता.