योगींचा थेट इशारा; इस्रायल युद्ध परिस्थितीवर सरकारविरुद्ध बोलू नका, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:46 AM2023-10-13T10:46:51+5:302023-10-13T10:48:20+5:30
नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला.
लखनौ - इस्रायलमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांत चर्चा होत आहे. अनेकजण या युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य करत आहेत. केंद्रातील भारत सरकारने इस्रायलला आपला पाठिंबा जाहीर केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांसमवेत फोनवरुन चर्चाही झाली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायल व हमास यांच्यातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. इस्रायल व फिलिस्तानी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धावरुन अलीगढ युनिव्हर्सिटीत पडसाद उमटले होते.
अलीगढ युनिव्हर्सिटीत हमास आणि फिलिस्तानच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर, योगी सरकारने कडक भूमिका घेत पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. इस्रायल व हमास युद्धात भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध कोणीही विधानं केली किंवा तशी कृती केल्यास त्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवरात्री आणि आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधला. यावेळी, योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या आहेत. त्यानुसार, इस्रायल व हमास युद्धजन्य परिस्थितीत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेविरुद्ध कुणीही भूमिका घेता कामा नये. तशा प्रकारचे विधानं किंवा कृती दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्वच धर्मगुरुंशी यांसदर्भात संवाद साधावा. सोशल मीडिया किंवा धर्मस्थळाच्या ठिकाणी कुठेही भारत सरकारचया भूमिकेविरुद्ध कोणीही आवाज करू नये, अशी भूमिका मुख्यमंत्री योगींनी घेतली आहे. यासंबंधी कोणीही तसे कृत्य केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल व हमास यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर अनेकजण भाष्य करत आहेत. सोशल मीडियावरही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. भारत सरकारने भूमिका स्पष्ट केल्यानंतर काही जणांनी सरकारच्या भूमिकेचा विरोध करत हमासचं समर्थनही केल्याचं पाहायला मिळालं. यातच ९ ऑक्टोबर रोजी अलिगढ युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थ्यांनी हमास संघटनेच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. यावेळी, वुई स्टँड फिलीस्तान अशी नारेबाजीही करण्यात आली. तसेच, AMU विद्यार्थ्यांनी अल्ला हू अकबर अशी घोषणाही दिली होती.