योगी सरकारकडून राज्यातील 1 कोटी युवकांना टॅबलेट अन् स्मार्टफोन फ्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 09:34 AM2021-12-25T09:34:58+5:302021-12-25T09:35:53+5:30
योगी सरकारकडून राज्यातील युवकांना तांत्रिकदृष्ट्या अप्रगेड करण्यासाठी मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
वाराणसी - उत्तर प्रदेशात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी मतदारांना विविध योजनांच्या माध्यमांतून आकर्षित करण्याचं काम राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील असंघटीत नोंदणीकृत कामगारांसाठी योगी सरकारने 2000 रुपये मदत निधी देण्याचे निर्देश जारी केले. त्यानंतर, आता राज्यातील युवक विद्यार्थ्यांना सरकारकडून खुश करण्यात येत आहे. सरकारकडून तब्बल 1 कोटी युवकांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन देण्यात येणार आहे.
योगी सरकारकडून राज्यातील युवकांना तांत्रिकदृष्ट्या अप्रगेड करण्यासाठी मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या टॅबलेट आणि स्मार्टफोनद्वारे युवकांना केवळ शिक्षण आणि नोकरीसंदर्भातील माहिती मिळणार आहे. आज अटलबिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 1 लाख युवकांना टॅबलेट आणि स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ईकाना स्टेडियम येथे हा कार्यक्रम होत आहे.
येथील कार्यक्रमात डिजीशक्ती अॅप आणि डिजीशक्ती पोर्टलचे उद्घाटनही योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. येथे देण्यात येणाऱ्या सर्वच स्मार्टफोन आणि टॅबटेमध्ये हे अॅप इंस्टॉल असणार आहे. त्यामाध्यमातून संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कंटेट देतील. सरकारने इन्फोसेस कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे, इन्फोसेसशी संबंधित शिक्षण व नोकरीसंदर्भातील 3900 प्रोग्राम युवकांना निशुल्कपणे वापरता येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 25 डिसेंबर रोजी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्वच युवकांना स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्यात येईल. त्यानंतर, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करुन ते वितरीत करण्यात येईल. ज्या युवकांची नोंदणी झाली नसेल त्यांनी उद्यापासून डिजीशक्ती पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आलं आहे.