गोवंश प्राण्यांच्या मृत्युने CM योगी नाराज, 8 अधिकाऱ्यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:44 PM2019-07-15T17:44:03+5:302019-07-15T17:44:09+5:30
योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे.
उत्तर प्रदेश- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गोवंश प्राण्यांचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाराज झाले आहेत. याप्रकरणी अयोध्या आणि मिर्झापूर जिल्ह्यातील 8 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री उशिरा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे संवाद साधला. तसेच प्रयागराजचे आयुक्त यांनाही वीज पडल्याने दगावलेल्या गोवंशच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतल्यानंतर, मिल्कीपूरचे बीडीओ, पशु आरोग्य अधिकारी मिल्कीपूर, ग्रामपंचायत अधिकारी पलियामाफी, मिल्कीपूर आणि प्रभारी कांजी हाऊस अयोध्यानगर डॉ. उपेंद्र कुमार आणि डॉ. विजेंद्र कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर, अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश आवास योजना, लखनौ विकास प्राधिकरण आणि नगर निगम लिमिटेड यांनी संयुक्तपणे अभियान राबवावे. त्यानुसार, अमौसी विमानतळापासून अर्जुनगंज, शहीदपथ आणि शहरातील विविध ठिकाणाच्या निराश्रित गोवंश प्राण्यांना पशु आश्रित स्थल कान्हा उपवन येथे सुरक्षितपणे ठेवण्याचे बजावले आहे. तसेच हे अभियान सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही नोटीस बजावली आहे. तसेच, मिर्झापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एके. सिंह, प्रभारी अधिशासी अधिकारी नगरपालिका मुकेश कुमार आणि नगर अभियंता रामजी उपाध्याय नगरपालिका मिर्झापूर यांचे निलंबन केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी गोवंश प्राण्यांची काळजी, आरोग्य, उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गोवंश प्राण्यांची संख्या लक्षात घेऊन शेड उभारण्याचेही सांगितले आहे.