योगी आदित्यनाथ तोडणार नोएडातील अंधविश्वास , खुर्ची जाण्याच्या भीतीने अनेकांनी जाणे टाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:04 AM2017-12-22T02:04:05+5:302017-12-22T02:04:21+5:30
नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे.
लखनऊ : नोएडा भागात भेट देणाºया मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाते असा अंधविश्वास येथील राजकारणात अनेक वर्षांपासून आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अंधविश्वास बाजूला सारून नोएडा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचे ठरवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर रोजी नव्या मेट्रो लाइनचे उद्घाटन होणार असून, या वेळी योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रोजी या मेट्रो लाइनचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ हे २३ रोजी नॉयडाला भेट देणार आहेत.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री आदित्यनाथ जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देतात. ते अंधविश्वासाला थारा देत नाहीत. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी नॉयडाला जाण्याचे टाळले होते. अखिलेश यादव २०१३मध्ये नॉयडात झालेल्या आशियाई विकास बँकेच्या शिखर संमेलनास उपस्थित राहिले नव्हते.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी होते. अखिलेश यादव यांनी सहा पदरी यमुना एक्स्प्रेस-वेसह अन्य विकासकामांचे उद्घाटन लखनऊतून व्हिडीओ कॉन्फरन्सने केले होते.
नोएडा (न्यू ओखला इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट एरिया) हा भाग उत्तर प्रदेशात असला तरी तो लखनऊपेक्षा दिल्लीच्या अधिक जवळ आहे. तो आता दिल्लीचा भागच मानला जातो.
हे तिघेही गेले नाहीत-
राजनाथ सिंह व मुलायम सिंह यादव हेही नॉयडात जाण्यास टाळाटाळ करत होते.
माजी मुख्यमंत्री वीर बहादूर हे जून १९९८मध्ये नॉयडाला गेल्यानंतर त्यांची खुर्ची गेली होती.
मायावती एकदा तिथे गेल्या. त्यानंतर त्या नॉयडात २०१२ची निवडणूक हरल्या. त्यामुळे हा अंधविश्वास पुन्हा वाढला.