‘योगी कार्ड’पुढे काँग्रेसचे डाव फेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:03 AM2018-12-03T04:03:02+5:302018-12-03T04:03:22+5:30
राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे.
- सुहास शेलार
जयपूर : राजस्थानात भाजपाच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसही प्रचारात आघाडी घेण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत आहे. मात्र, भाजपाच्या ‘योगी कार्ड’पुढे त्यांचे सर्व डाव फोल ठरत आहे. कारण भाजपाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशा प्रभागांत प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे जेथे काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे योगी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १५ मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे, तर भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवारास निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. राजस्थानात १६ असे मतदारसंघ आहेत, जेथे मुस्लीमांची मते निर्णायक ठरतात. आणि ही मते परंपरागत पद्धतीने काँग्रेसलाच मिळतात. मात्र यंदा बंडखोरी करत या सर्व मतदारसंघातून अपक्ष आणि स्थानिक पक्षाचे मिळून ३८२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या पैकी १२५ उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामुळे मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. त्यामुळे येथे हिंदु मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे ओळखून भाजपाने येथे योगी कार्ड पुढे केले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने आजवर केवळ मुस्लीमांचेच भले केले, त्यामुळे तो मुस्लीमांचाच पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याशिवाय रामभक्तांनी भाजपाला, तर रावणभक्तांनी काँग्रेसला मतदान करा, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले. योगींच्या प्रचार सभांना हिंदूंचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच योगींनी आत्तापर्यंत ज्या मतदारसंघात सभा घेतल्या आहेत, तेथील भाजपाच्या उमेदवाराला हिंदू मतदारांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लीम बहुल मतदारसंघात योगींच्या सभा घेण्याची मागणी उमेदवारांकडून वाढली आहे. राजस्थानात पंतप्रधान मोदी यांच्यानंतर योगी यांचा चेहरा प्रभावी ठरला आहे. योगींनी आत्तापर्यंत आमेर, अजमेर, उदयपूर या मुस्लीम बहुल जिल्ह्यांत जोरदार प्रचार केला आहे.
राजस्थानात बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला जनता आणि स्वपक्षातील मंडळी कंटाळली आहे. अशा परिस्थितीत जरी योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांना हिंदुंचा प्रतिसाद मिळत असला, तरी त्या प्रतिसादाचे मतांमध्ये परिवर्तन होईल का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
जाहीरनाम्यालाही धार्मिक रंग
हिंदू मतदारांना प्रभावीत करण्यास भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातून अनेक धार्मिक मुद्दे हाताळले आहेत. गायींची तस्करी रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याचे आश्वासन, गो-रक्षा पथके वाढविणे, तसेच ‘गारेख’ नावावर बंदी आणणे, बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लीमांना शोधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यातून दिले आहे.
ओवेसींच्या सभेस नकार
राजस्थानातील काही मुस्लीम संघटनांनी एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी येथे प्रचारसभा घेण्यासाठी साफ नकार दिला. ते सध्या तेलंगणात स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत.
>वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत
योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात आत्तापर्यंत केलेल्या प्रचारातून केवळ धार्मिक मुद्देच हाताळले आहेत. काँग्रेस कसा मुस्लीमांचा पक्ष आहे, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करताना ते दिसतात. ‘काँग्रेस रखे अली, हमें चाहिये बजरंग बली’, ‘रामभक्त भाजपाको और रावणभक्त काँग्रेस को वोट दो’, ‘बजरंगबली दलित, आदिवासी, गिरवारी, वनवासी और वंचित थे’, ‘राहुल गांधी के परदादा कहते थे मै एक्सिडेंटली हिंदू हुँ’, ‘काँग्रेस कहती थी संसाधनोंपर पहला हक मुस्लीमोंका’ अशा काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे योगी नेहमी चर्चेत राहिले आहेत.