अजून एका ठिकाणाचे नाव बदलणार योगी सरकार, केंद्र सरकारला पाठवला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:51 PM2021-08-03T19:51:24+5:302021-08-03T19:52:00+5:30
Uttar Pradsh Yogi Government: यावेळेस योगी सरकार शहराचे नाही तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याच्या विचारात आहे.
नवी दिल्ली:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी यापूर्वीच राज्यातील तीन प्रमुख ठिकाणांची नावं बदलली आहेत. योगी सरकारने इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसरायचे दीनदयाल उपाध्याय नगर आणि फैजाबादचे अयोध्या केले आहे. आता परत एकदा अजून एका ठिकाणाचे नाव बदलले जाणार आहे. पण, यावेळेस शहराचे नाव नाही, तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले जाणार आहे.
रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वी अनेकदा जिथे गरज असेल तिथे नाव बदलले जाणार, असे म्हटले आहे. आज झांसी रेल्वे स्टेशन (Jhansi Railway Station) चे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती योगी सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.
ही आहे नाव बदलण्याची प्रक्रिया
केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, झांसी रेल्वे स्टेशनचे नाव ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार, संबंधित संस्थांशी चर्चा करुन त्यांचे मत मागवले जाईल आणि त्यानंतर नाव बदलण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणत्याही ठिकाणाचे नाव बदलण्याची परवानगी रेल्वे मंत्रालय आणि डाक व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या NOC नंतर गृह मंत्रालयाकडून मिळते.