'देशातील ९५ टक्के जनता पेट्रोलचा वापरच करत नाही, इंधन अजूनही स्वस्तच'; योगी सरकारमधील मंत्री बरळले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 18:33 IST2021-10-21T18:32:41+5:302021-10-21T18:33:38+5:30
भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील क्रीडा व युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी (UP Minister Upendra Tiwari) यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत अजब तर्कट मांडलं आहे.

'देशातील ९५ टक्के जनता पेट्रोलचा वापरच करत नाही, इंधन अजूनही स्वस्तच'; योगी सरकारमधील मंत्री बरळले!
नवी दिल्ली-
भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील क्रीडा व युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी (UP Minister Upendra Tiwari) यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत अजब तर्कट मांडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे, तर देशातील ९५ टक्के जनता पेट्रोल आणि डिझेलचा वापरच करत नाही, असं विधान उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर तिवारी यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आमच्या कार्यकाळात जो व्यक्त मेहनतीनं परीक्षा उत्तीर्ण करेल फक्त तोच अधिकारी बनू शकतो, असं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील उरई येथील एका कार्यक्रमात उपेंद्र तिवारी उपस्थित होते. यात उपेंद्र यांना राज्यातील बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिवारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "देशात नागरिकांना १०० कोटींहून अधिक कोरोना विरोधी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आपण जर इंधनाच्या किंमतीची देशातील प्रत्येक नागरिकांच्या उत्पन्न क्षमतेशी तुलना केली तर सध्याच्या इंधनाच्या किमती अजूनही कमीच आहेत असं लक्षात येईल", असं अजब विधान उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे.
"देशातील ९५ टक्के जनता पेट्रोल आणि डिझेलचा वापरच करत नाही. फक्त मुठभर लोक पेट्रोल आणि डिझेल वापरतात. असं असलं तरी अजूनही इंधनाच्या किमतीत वाढ झालेली नाही", असंही ते म्हणाले.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ
योगी सरकारमधील मंत्री पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजूनही कमीच असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरात जवळपास ५ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर १०६.५४ रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर मुंबईत पेट्रोल तब्बल ११२.४४ रुपये प्रतिलीटर इतकं झालं आहे.