योगी सरकारने प्रायश्चित्त करावं; आरएसएस नेत्याचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 09:29 AM2017-08-16T09:29:40+5:302017-08-16T09:31:58+5:30
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत.
नवी दिल्ली, दि. 16- उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेल्या ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले आहेत. अवध क्षेत्राचे आरएसएसचे प्रांत संघचालक प्रभु नारायण यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून योगी सरकारवर टीका केली आहे.
प्रभु नारायण यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं, 'या प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईत कोणीही दोषी ठरलं तरी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व मंत्री आणि उत्तर प्रदेश भाजपच्या सदस्यांनी याचं प्रायश्चित्त करायला हवं.' राज्य सरकारने एक 'प्रायश्चित्त दिवस' आयोजित करावा, असा सल्ला प्रभु यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून योगी सरकारला दिला आहे.
'राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी पीडित मुलांच्या शोकाकुल कुटुंबीयांचं सांत्वन त्यांच्या घरी जाऊन तर करायला हवंच, पण त्यासोबतच एक दिवसाचा उपवास करायला हवा. अशा संवेदनशील परिस्थितीच्या सामना कसा करायचा ते या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकायला हवं, असं प्रभु नारायण यांनी या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे.
आणखी बातम्या वाचा
(सैनिकांनो बंदुकी मोडा अन् काश्मिरींना मिठ्या मारा, सामनातून मोदींवर टीका)
(नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी)
(आस्थेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी)
'चौकशी करून फक्त काही लोकांना बळीचा बकरा बनवण्याने काही उपयोग होणार नाही. गोरखपूर घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आणि आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही नारायण प्रभु यांनी टीका केली आहे. विद्यमान सरकारने या पत्रकार परिषदेत मागच्या मृत्यूंची आकडेवारी देणं योग्य नव्हतं. तो फक्त आकड्यांचा खेळ वाटला, त्यात संवेदनशीलता नव्हती, असं नारायण प्रभु यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नारायण प्रभु म्हणाले, आपण कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा मागत नाही आहोत आणि राजकीय विचारांनी बोलत नाही आहोत. 'देशात भाजपाव्यतिरिक्त कोणताही राजकीय पर्याय नाही. भाजपचं कोणतंही नुकसान होऊ नये असं मला वाटतं. सरकारमध्ये आमची लोक खूप साधारण आणि स्पष्ट आहेत. म्हणूनच गोरखपूर घटनेनंतर झालेली पत्रकार परिषद अनुभवी अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी होती. जर आमचे राजकारणी आणि मंत्री अशा विषयांवर बोलतात तर त्यांच्या बोलण्यातून संवेदनशीलचा आणि दुःख लोकांच्या समोर यायला हवं.