Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:56 AM2021-12-17T07:56:26+5:302021-12-17T07:57:27+5:30

केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता.

yogi govt claims no person died due to lack of oxygen during second wave of corona in uttar pradesh | Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

Next

लखनऊ: कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा तडाखा बसला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्सिजनची कमतरता हा मुद्दा त्यावेळी चांगलाच गाजला होता. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांचे खूप हाल झाल्याचे दिसले. यातच आता उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा योगी आदित्यनाथ सरकारने केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, एका प्रश्नाला उत्तर देताना योगी सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य दीपक सिंह यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पूर्ण उत्तर प्रदेश राज्यात किती मृत्यू झाले, याविषयीचा प्रश्न विचारून राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. या प्रश्नाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी लेखी उत्तर दिले.

ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे लेखी उत्तर दिले आहे. तसेच जर ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू झाला असेल, तर वाराणसी, गोरखपूर जनपद-लखनऊ येथे त्याची संख्या किती होती, यासंदर्भात पटलावर माहिती ठेवावी, असे जोड प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रश्न येत नाही, असेही जय प्रताप सिंह यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

दरम्यान, भारतात यावर्षीच्या एप्रिल ते जून महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. या कालावधीत हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, लसींचा अपुरा पुरवठा, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा यांमुळे देशात हाहाःकार माजला होता. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर केंद्रावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
 

Web Title: yogi govt claims no person died due to lack of oxygen during second wave of corona in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.