'योगीजी, तुमच्या उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था झोपलीय', प्रियांका गांधी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 09:10 AM2021-12-30T09:10:56+5:302021-12-30T09:11:15+5:30
Priyanka Gandhi : एका दलित अल्पवयीन मुलीला दोन तरुणांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली : अमेठीमध्ये चोरी केल्याच्या आरोपावरून एका दलित अल्पवयीन मुलीला दोन तरुणांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
योगीजी, तुमच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था झोपलेली दिसते, असे त्या म्हणाल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीला जमिनीवर पाडून दोन तरुण काठीने मारत आहेत. त्या दोघांच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलाही या मारहाणीला प्रोत्साहन देत आहेत, असा व्हिडिओ व्हायरल होताच उत्तर प्रदेशात खळबळ उडाली.
त्यावर ट्विटरवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, हा प्रकार अत्यंत निंदाजनक आहे. उत्तर प्रदेशात रोज दलितांविरुद्ध ३४ आणि महिलांच्या विरोधात १३५ गुन्हे घडतात. या प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक न केल्यास आम्हाला नाइलाजाने सरकारच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
आरोपींचा शोध सुरू
पोलिसांनी सांगितले की, आम्ही दोन्ही आरोपींचा शोध घेत आहोत. संबंधित मुलगी व तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदवून घेतला आहे. दोन तरुणांनी तिचा लैंगिक छळ केल्याने पोस्कोखालीही गुन्हा नोंदवून घेतला आहे.