यूपीवर ‘योगी’राज
By admin | Published: March 19, 2017 12:25 AM2017-03-19T00:25:41+5:302017-03-19T00:25:41+5:30
आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून परिचित असलेले योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपा यापुढील काळात
लखनौ : आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून परिचित असलेले योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपा यापुढील काळात हिंदुत्वाचा राम मंदिराचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरेल आणि ट्रिपल तलाकला विरोध करेल, अशी अटकळ आहे. आदित्यनाथ यांची आतापर्यंतची भूमिका पाहता, राज्यात तणाव निर्माण होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार आहे. हे तिघेही उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य नाहीत. भाजपा आमदारांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ४४ वर्षीय आदित्यनाथ हे गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करीत आहेत. ते मुख्यमंत्री होण्यास उत्सुक होते आणि त्यांनी आपल्या समर्थकांमार्फत भाजपा नेत्यांवर प्रचंड दबाव आणला होता.
आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ते उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील असून, तेथील ६0 मतदारसंघांवर त्यांचा पगडा असल्याचे सांगण्यात येते. ते हिंदू युवा वाहिनीचे संस्थापक असून, काही धार्मिक दंगलींप्रकरणी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले असल्याचे कळते. उपमुख्यमंत्री बनणारे मौर्य हे फुलपूर मतदारसंघाचे खासदार आहेत.
केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आदित्यनाथ यांच्या नेतेपदी झालेल्या निवडीचा तपशील दिला. त्यांनी सांगितले की, आमदार बनलेले सुरेश खन्ना यांनी आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला १0 आमदारांनी अनुमोदन दिले. आदित्यनाथ यांच्या नावाचा प्रस्ताव आल्यानंतर, सर्व आमदारांनी एकमुखाने त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. आदित्यनाथ यांनी आपणास दोन उपमुख्यमंत्री हवे असल्याचे बैठकीत सांगितले. त्यामुळे मौर्य आणि शर्मा यांची उपमुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. (वृत्तसंस्था)
तेव्हाच झाले चित्र स्पष्ट
आदित्यनाथ बैठकीला आले, तेव्हाच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या आधी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांचे नाव आघाडीवर होते, पण बैठक सुरू होण्याच्या सुमारात त्यांनी लखनौ सोडल्याने ते मुख्यमंत्री होणार नाहीत, हे स्पष्ट झाले.
योगी आदित्यनाथ यांंंचा रविवारी दुपारी अडीच वाजता शपथविधी होणार असून, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहाणार आहेत.