योगींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा रिक्षाचालकासोबत वाद, मध्यस्थी करणाऱ्या फूल विक्रेत्याला केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 19:40 IST2025-02-23T19:38:20+5:302025-02-23T19:40:10+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली.

योगींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा रिक्षाचालकासोबत वाद, मध्यस्थी करणाऱ्या फूल विक्रेत्याला केली मारहाण
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली. येथे ट्रॅफिक जॅम झाल्याने वादावादी सुरू होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री सोमेंद्र तोमर यांचा पुतण्या आपल्या महिंद्रा स्कॉर्पियो कारमधून रस्त्यावरून जात होता. त्यावेळी त्याला एका ई-रिक्षाचालकामुळे थांबावं लागलं. त्यावरून ई-रिक्षाचालक आणि त्याच्यामध्ये वादावादी सुरू झाली. तसेच त्याने या ई-रिक्षाचालकाला शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फुलविक्रेत्या जोडप्याने मध्ये पडत भांडण मिठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद आणखी वाढला.
ही संपूर्ण घटना एका स्थानिक दुकानासमोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. यामध्ये सुरुवातीला वादावादी होताना आणि नंतर मंत्रांचा भाचा आणि फुलविक्रेत्यामध्ये मारामारी होताना दिसत आहे. काही वेळाने एक महिला काठी घेऊन येताना दिसते. तसेच ती मंत्र्यांच्या पुतण्यावर मारताना दिसत आहे. त्यानंतर तिथे असलेले लोक फूल विक्रेत्या दाम्पत्याला पाठिंबा देताना दिसतात. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळतो.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचतात. दरम्यान, दोन्ही बाजूंमध्ये परस्पर सहमती झाली. तसेच पोलिसांकडे कुठलीही लेखी तक्रार दाखल करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तसेच मारहाण करणारा आरोपी हा खरंच मंत्र्यांचा पुतण्या होता की नाही, याला दुजोरा देता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.