योगींचे राज्यारोहण!
By admin | Published: March 20, 2017 04:06 AM2017-03-20T04:06:26+5:302017-03-20T04:06:26+5:30
कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ (४४) यांनी रविवारी येथे उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ
लखनौ : कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेले भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ (४४) यांनी रविवारी येथे उत्तर प्रदेशचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राम नाईक यांनी केशव प्रसाद मौर्य व डॉ. दिनेश शर्मा यांना उप मुख्यमंत्रिपदाची, तर एकूण ४७ जणांना मंत्रिपदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरद्वारे आदित्यनाथ यांचे आणि त्यांच्या मंत्र्यांचे अभिनंदन केले आणि उत्तर प्रदेशचे उत्तम प्रदेश होईल, अशी ग्वाहीही दिली.
झुकते माप : मंत्रिमंडळात पूर्वांचलला झुकते माप देण्यात आले असून, या भागातील १७ आमदारांना मंत्रिपद दिले आहे.
राजनाथ पुत्राला जागा नाही- नोएडा येथून विजयी झालेले राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली नाही.
यूपीत एकच मुस्लीम चेहरा
आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकाच मुस्लीम चेहऱ्याला जागा मिळाली आहे. मोहसीन रजा यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.
ते भाजपाचे प्रवक्ता आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लीम चेहऱ्याला उमेदवारी दिली नव्हती.
भेदभावाचे नाही विकासाचे राजकारण
सोहळ्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्वांचा विकास करणार, भेदभाव करणार नसल्याचे स्पष्ट केले. सर्व मंत्र्यांना १५ दिवसांमध्ये संपत्ती जाहीर करण्याचे आदेशही देऊन, पारदर्शकतेचा केंद्रीय पायंडा यूपीत सुरू केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचा विकास, यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.