आप आमदारांना लक्ष्य करण्यामागे पंतप्रधान
By admin | Published: July 29, 2016 03:00 AM2016-07-29T03:00:36+5:302016-07-29T03:00:36+5:30
दिल्लीत आमच्या आमदारांना लक्ष्य केले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामागील सूत्रधार आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने गुरुवारी येथे केला.
नवी दिल्ली : दिल्लीत आमच्या आमदारांना लक्ष्य केले जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामागील सूत्रधार आहेत, असा आरोप आम आदमी पार्टीने गुरुवारी येथे केला.
आमच्या आणखी काही आमदारांना आत टाकले जाऊ शकते. तथापि, पक्ष झुकणार नाही, असे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘आमचे आमदार नरेश यादव आणि अमानतुल्ला खान यांंना एकाच दिवशी अटक करण्यात आली. पोलिसांनी खान यांच्या कुटुंबीयांशी गैरवर्तणूक करीत त्यांना ताब्यात घेतले. उपसभापती राखी बिर्ला यांनाही अशीच वागणूक देण्यात आली. आमच्या आमदारांवर एकापाठोपाठ सुरू असलेल्या हल्ल्यांमागील एकमेव सूत्रधार मोदीजी आहेत, असा आरोप आशुतोष यांनी केला.
ते म्हणाले, ‘आमच्या १० आमदारांना गजाआड करण्यात आले. आमदार शरद चौहान यांची सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. एका आमदारावर आयकर खात्याची धाड पडली, तर मंत्र्यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने २१ आमदारांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न झाला. राखी आणि चौहान यांनाही आज सायंकाळपर्यंत अटक होऊ शकते, असे मला माझ्या सूत्रांकडून समजले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)