तुम्हीच जबाबदार आहात, बलात्कार प्रकरणातील पीडितेला उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले; आरोपीला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:50 IST2025-04-10T14:49:21+5:302025-04-10T14:50:04+5:30
आरोपीने नोएडामध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला.

तुम्हीच जबाबदार आहात, बलात्कार प्रकरणातील पीडितेला उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले; आरोपीला जामीन मंजूर
एका बलात्कार प्रकरणात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडितेला कथित गुन्ह्यासाठी जबाबदार धरले आणि आरोपीला जामीन मंजूर केला. हे प्रकरण सप्टेंबर २०२४ मधील आहे, 'तिला एका बारमध्ये भेटलेल्या एका पुरूषाने ती दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला', असा आरोप एका विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने केला होता.
या प्रकरणी सुनावणी झाली. आरोपीने जामीनासाठी अर्ज केला होता, 'महिलेने स्वतः त्याच्यासोबत जाण्यास सहमती दर्शविली होती आणि हे लैंगिक संबंध संमतीने झाले होते',असं जामीन अर्जात म्हटले आहे.
न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आरोपीला ११ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर दिल्लीतील हौज खास येथील एका बारमध्ये भेटलेल्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. न्यायालयाने म्हटले की, मुलीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले होते आणि या कथित घटनेसाठी ती जबाबदार आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडितेने तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका विद्यापीठात शिकणारी एक विद्यार्थीनी तीन मैत्रिणींसह दिल्लीतील एका बारमध्ये गेली होती. तिला तिथे काही ओळखीच्या लोकांशी भेट झाली, यात आरोपीचाही समावेश होता. दारू पिल्यानंतर ती दारूच्या नशेत होती आणि आरोपी तिच्या जवळ येत होता, असं नोएडा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे.
ते पहाटे ३ वाजेपर्यंत बारमध्ये होते आणि आरोपीने वारंवार महिलेला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. वारंवार विनंती केल्यानंतर, ती आरोपीसोबत जाण्यास तयार झाली, असं महिलेने म्हटले आहे. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता आणि तिला नोएडा येथील त्याच्या घरी नेण्याऐवजी, त्याने तिला गुडगाव येथील त्याच्या नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा गंभीर आरोप या तक्रारीमध्ये केला आहे.
आरोपीने सर्व सहमतीने झाल्याचे सांगितले
महिलेला मदतीची आवश्यकता होती आणि ती स्वतः त्याच्यासोबत त्याच्या घरी विश्रांतीसाठी जाण्यास तयार झाली. आरोपीने महिलेला त्याच्या नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर दोनदा बलात्कार केल्याचा आरोपही फेटाळून लावला आहे. त्याचा दावा आहे की बलात्कार झालाच नाही तर तो संमतीने झालेला लैंगिक संबंध होते.