Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 05:53 PM2020-02-03T17:53:08+5:302020-02-03T17:59:13+5:30
Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपानंही आता मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उतरवलं आहे. मोदींनीही प्रचारसभेत केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पार्टी आणि भाजपा आमने-सामने आलेले आहेत. त्यातच भाजपा या आंदोलनाचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा उचलत असल्याचा आरोप आपच्या अरविंद केजरीवालांनी केला आहे. तर भाजपाचे नेते मनोज तिवारी आणि खासदार परवेश वर्मा हे शाहीन बाग आंदोलनावरून आम आदमी पार्टीवर पलटवार करत आहेत. त्याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवालांवर घणाघाती टीका केली आहे.
दिल्लीतली जनता त्यांच्या बाजूनं उभी होती, तिनंसुद्धा आता त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्याचंही एक कारण आहे. त्यामुळे केजरीवाल केविलवाणा चेहरा करून मी काय आतंकवादी आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. पण केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत. मी अराजकवादी आहे, असं केजरीवालांनी स्वतः सांगितलं आहे. अराजकवादी आणि दहशतवाद्यांमध्ये जास्त फरक नसतो, असं म्हणत जावडेकरांनी केजरीवालांवर टीकास्त्र सोडलं आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून निषेध मोर्चे आणि आंदोलनं काढली जात आहेत. त्यातच शाहीन बागमधल्या आंदोलनात एका तरुणानं गोळीबार केल्यानं हे प्रकरण चांगलेच तापले होते. भाजपानंही या मुद्द्यावर आम आदमी पार्टीला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेत शाहीन बागचा मुद्दा गाजतोय. दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपनं 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. भाजपला तीन जागांवर यश मिळाले तर काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते.#WATCH Union Minister Prakash Javadekar in Delhi: Kejriwal is making an innocent face & asking if he is a terrorist, you are a terrorist, there is plenty of proof for it. You yourself had said you are an anarchist, there is not much difference between an anarchist & a terrorist. pic.twitter.com/vRjkvFKGEO
— ANI (@ANI) February 3, 2020