आप नेत्या सोनी सोरी यांच्यावर अॅसिड सारख्या रसायनाने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2016 12:56 PM2016-02-21T12:56:19+5:302016-02-21T13:09:04+5:30
सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या सोनी सोरी यांच्या चेह-यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिडसारखे रसायन फेकले.
Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २१ - छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या सोनी सोरी यांच्या चेह-यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिडसारखे रसायन फेकले. गीदाम पोलिस स्थानकाच्या हद्दीत रात्री साडेदहाच्या सुमारास जावंगा गावाजवळ ही घटना घडली.
सोरी त्यांच्या दोन सहका-यांसह दुचाकीवरुन जगदालपूरहून गीदामच्या दिशेने जात असताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोरी यांनी दिलेल्या जबानीनुसार बस्तानार घाट सोडल्यानंतर दुचाकीवरुन चाललेल्या तीन युवकांनी त्यांना थांबवले. त्यांना दुचाकीवरुन उतरवले व लगेच एकाने त्यांच्या चेह-यावर अॅसिडसारखे रसायन फेकले आणि तिथून पोबारा केला. सोनी यांच्या सहका-यांनी त्यांना तात्काळ गीदाम येथील रुग्णालयात दाखल केले व या घटनेची पोलिसांना माहिती दिली.