महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:25 AM2023-08-04T11:25:25+5:302023-08-04T11:26:53+5:30
आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
भाजपा जाणिवपूर्वक घराणेशाहीचा उल्लेख करीत असते. पण जेव्हा एनडीएची बैठक असते तेव्हा घराणेशाहीचे प्रोडक्ट असणारे अनेक नेते त्या बैठकीला उपस्थित राहतात, हे तुम्ही लपवू शकणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या भाषणात केली. मी स्वतः घराणेशाहीची प्रोडक्ट असले तरी प्रतिभा-शरद पवार यांची मी मुलगी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही सुप्रिया सुळेंनी सभागृहात सांगितले.
आम आदमी पक्षाने आमच्यावर एकेकाळी आमच्यावर टीका केली होती. हे मान्य, पण माझ्या मतदारसंघात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर नॅचरली करप्ट पार्टी अशी टिका भाजपाच्या नेत्यांनी केली. मात्र आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सत्तेत सोबत घेताना हे आरोप कुठे गेले?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपाने माफी मागितली पाहिजे अशी ठाम भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
Opposed the The Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Bill, 2023 in LokSabha today on following grounds:
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2023
1. The Bill being undemocratic, unconstitutional and against cooperative federalism. ‘Control’ repeatedly used by lead Speaker of BJP is not the right… pic.twitter.com/a6MqgXfvIY
लोकसभेत नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक २०२३ मांडण्यात आले. या विधेयकाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठामपणे विरोध केला. यावेळी बोलताना हे विधेयक असंवैधानिक, लोकशाहीविरोधी आणि सहकारी संघराज्यवादाच्या विरोधात असल्याची भूमिका मांडली. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीत केंद्राचे नियंत्रण हा योग्य शब्द नसल्याचे नमूद केले. भाजपाच्या वतीने हा शब्द वापरला गेला त्याचा विरोध केला. भाजपाने दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन आपल्या प्रत्येक निवडणूक जाहिरनाम्यात दिले, ही वस्तुस्थिती असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
एकिकडे दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे तिथली सत्ता आपल्या हातात नाही म्हणून दिल्लीच्या लोकनिर्वाचित सरकारवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी विधेयक आणायचे ही दुतोंडी भूमिका आहे. एकतर भाजपा निवडणूक जाहिरनाम्यात खोटे बोलते किंवा आता लोकशाहीच्या मंदिरात खोटे बोलत आहे, याचे उत्तर त्यांना दिल्लीच्या जनतेला द्यावे लागेल असे सुप्रिया सुळेंनी नमूद केले. जम्मू काश्मीर या संपूर्ण राज्याचे त्रिभाजन करताना तेथे वर्षभरात निवडणूक घेऊ असा विश्वास संसदेला देण्यात आला होता. परंतु आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
भाजपा दुहेरी भूमिका काय घेतंय?
नैतिकता हा भाजपाच्या नेत्यांचा आवडता शब्द आहे. देशातील जनतेने दोन वेळा त्यांना बहुमत देऊन जनादेश दिला असा त्यांचा दावा देखील आहे. मग हाच न्याय आम आदमी पक्षाला का लागू होत नाही हा सवाल उपस्थित केला. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी त्यांना स्पष्ट जनादेश आहे. पण तरीही हे विधेयक आणले जाते ही दुहेरी भूमिका भाजपा का घेत आहे? भाजपाच्या प्रमुख वक्त्यांनी नमूद केल्याप्रमाणे ही निवडणूक प्रक्रियेतील हेराफेरी नाही का असा प्रश्न विचारला. सचिवांना जर चुकीची वागणूक मिळाली असेल तर ती निश्चितच चुकीची आहे. मग ती दिल्ली असो किंवा महाराष्ट्र. पण दोन्हीकडे तुम्हाला समान न्याय द्यावा लागेल, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.