'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:29 PM2020-09-09T16:29:55+5:302020-09-09T16:46:21+5:30
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेचा वाद चांगलाच रंगला आहे. कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊन देणार नसल्याचे शिवसेनेनं म्हटलं होत. त्यानंतर, आज कंगना मुंबईत दाखल झाली आहे. आज सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवर टीका केली असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्यचां म्हटलंय. आता, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या गीता फोगाटनेही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनानं १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.
ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर
— geeta phogat (@geeta_phogat) September 9, 2020
कंगना राणावत का ऑफ़िस तोड सकते है हिम्मत नहीं !!!!
@KanganaTeam
कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर भाजपा नेते तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका करताना, ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचे म्हटले. त्यानंतर, महिला कुस्तीपटू गीता फोगाटनेही ट्विट करुन कंगनाचे समर्थन केले आहे. तसेच, शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीक केलीय. ''ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर कंगना राणावत का ऑफ़िस तोड सकते है हिम्मत नहीं'', असे ट्विट गीता फोगाटने केले आहे. गीताने यापूर्वीही अनेकदा कंगनाची बाजू घेतली होती, तसेच सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीच्या मागणीला समर्थनही दिले होते.
मोदींच्या फोटोमुळे ट्रोल
2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून गीतानं इतिहास रचला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून देणारी ती पहिली खेळाडू ठरली. शिवाय ऑलिम्पिकचे तिकीट पटकावणारीही ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिच्या या यशोगाथेवर 'दंगल' हा चित्रपट तयार करण्यात आला. गीतानं 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. शिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर दोन कांस्य, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक आहे. गीतानं राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना प्रसिद्ध केलेल्या फोटोवरुन ती ट्रोल झाली होती.