'तुम्ही अन्य कुठे जिंकू शकत नाही, पाकिस्तान नाहीतर बांगलादेशमध्ये जाऊन पक्ष स्थापन करा', ओवेसींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 04:26 PM2018-02-23T16:26:10+5:302018-02-23T16:26:25+5:30
भाजपा खासदार विनय कटियार यांनी मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे
नवी दिल्ली - भाजपा खासदार विनय कटियार यांनी मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना पाकिस्तान किंवा बांगलादेशात जाऊन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. 'तुम्ही अन्य कुठे जिंकू शकत नाही त्यामुळे पाकिस्तान नाहीतर बांगलादेशमध्ये जाऊन पक्ष स्थापन करा', असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे. असदुद्दीन ओवेसी गेल्या काही दिवसांपासून भाजपाविरोधी वक्तव्यं करत आहेत. यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विनय कटियार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'ओवेसींनी हवे तितके प्रयत्न केले तरी ते फक्त आपल्याच मतदारसंघात जिंकू शकतात. त्यांची लोकसंख्या तिथेच जास्त असून इतर कुठेही नाही. त्यामुळे अन्य कुठेही ते जिंकू शकत नाहीत. त्यांचा प्रभाव वाढत नाहीये, त्यामुळे ते व्याकूळ झाले आहेत. म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं ते करत आहेत. त्यांच्याकडे अन्य कोणताही विषय नाहीये. त्यांच्यासाठी चांगलं आहे की त्यांनी बांगलादेशला जावं आणि पक्ष स्थापन करावा. नाहीतर मग पाकिस्तानला जावं आणि तिथे पक्ष स्थापन करावा. तिथे कदाचित ते काही जागा जिंकतील. त्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही', असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे.
यावेळी एका पत्रकाराने विनय कटियार यांना याचा अर्थ ओवेसी यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशात जाऊन पक्षविस्तार करावा असं म्हणायचं आहे का ? विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करण्यात काय वाईट आहे. तिकडे जाऊनही प्रयत्न करा, बघा कशाप्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. त्याआधारे निर्णय घ्यावा'.
लष्करप्रमुखांनी राजकीय गोष्टींमध्ये नाक खुपसू नये- ओवेसी
लष्करप्रमुखांनी देशातील राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करता कामा नये, असे सांगत एमआयएमचे खासदार असुदद्दीन ओवेसी यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या विधानाविषयी नापसंती दर्शविली होती. दिल्लीत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात बिपीन रावत यांनी आसाममधील राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी रावत यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला.
ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, लष्करप्रमुखांनी देशातील राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या विस्ताराबाबत मतप्रदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य नाही. लोकशाहीने व देशाच्या संविधानाने राजकीय पक्षांना स्वातंत्र्य दिले आहे. लष्कराने नेहमीच देशातील जनतेने निवडून दिलेल्या नेतृत्वाच्या आदेशानुसार काम केले पाहिजे, असे ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बिपीन रावत बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात बोलत होते. यावेळी त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आसाममधील मौलाना बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) या संघटनेचे उदाहरण दिले. ही संघटना गेल्या काही वर्षांमध्ये भाजपापेक्षाही वेगाने वाढत आहे. काही वर्षांपूर्वी जनसंघाचे केवळ 2 खासदार होते आणि तरीही भाजपा आज या स्तरावर पोहोचली आहे. परंतु, एआययूडीएफच्या विस्ताराचा वेग थक्क करणारा आहे. ही संघटना भाजपापेक्षा कितीतरी वेगाने विस्तारत चालली आहे. एक दिवस असा येईल की, आपल्याला आसामासंदर्भात काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. आपण आता ईशान्य भारतातील लोकसंख्येच्या स्वरुपावर नियंत्रण ठेवू शकतो, असे मला वाटत नाही. यापूर्वी या परिसरातील केवळ पाच जिल्ह्यांमध्येच मुस्लीमबहुल लोकसंख्या होती. मात्र, आता या जिल्ह्यांची संख्या साधारण 8 ते 9 इतकी झाली आहे. त्यामुळे आता या लोकांना आपल्यात सामावून घेण्यातच शहाणपणा आहे, असे रावत यांनी सांगितले.