प्रवाशांचा वेळ वाचणार, उबर टॅक्सी बुकिंगसह मेट्रो प्रवासाचाही पर्याय मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 08:52 AM2019-10-23T08:52:12+5:302019-10-23T08:54:37+5:30
मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवा उबरने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नवी दिल्ली - मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवा उबरने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उबर टॅक्सी बुकिंगसह मेट्रो प्रवासाचाही पर्याय लवकरच मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच त्यामुळे मेट्रो स्थानकावर टोकन खरेदी करावे लागणार नाही. शिवाय मेट्रो पासचीही गरज नसेल. बारकोड स्कॅन केल्यावर मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार आहे.
स्थानकातून बाहेर पडतानाही तोच कोड स्कॅन करता येईल. आशियात अशी सोय असलेले दिल्ली हे पहिलेच शहर ठरणार आहे. स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स कार्यक्रमात उबरचं मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खास्त्रोवशाही व दिल्ली मेट्रो रेल प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. दिल्लीतील एकूण 210 मेट्रो स्थानकांवर ही सेवा असणार आहे. उबर व डीएमआरसीमध्ये त्यासंबंधी करार झाला आहे.
पहिल्या दिवशी ही सेवा केवळ चार मेट्रो स्थानकांवर सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात काही दिवसांमध्ये 46 स्थानकांवर ही सेवा सुरू होईल. बोस्टन, शिकागो, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, पॅरिस व सिडनीनंतर आता दिेल्लीत ही सेवा असेल. उबर अॅपवर पब्लिक ट्रान्सपोर्टचा नवा पर्याय असणार आहे. प्रवासी लास्ट माईल पर्याय निवडू शकतील. कोणत्याही ठिकाणाहून प्रवास सुरू होईल, त्यानंतर मेट्रोने निश्चित स्थळी पोहोचता येईल. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यास पुन्हा उबर टॅक्सीने प्रवास करता येईल. यालास लास्ट कनेक्टीव्हीटी असे डीएमआरसीने म्हटले आहे.
उबरने भारतात एअर टॅक्सी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणी सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वी उबरचे हेड निखिल गोयल यांनी इकोनॉमिक्स टाइम्स या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना ही माहिती दिली होती. उबरने मागील वर्षभरापासून भारत, जपान, फ्रान्स, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उबर एअर प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उबरचे एलिवेट हेड एरिक एलिसन यांनी उबर एअर टॅक्सी लॉन्चिंग करण्यासाठी साधारण 5 ते 10 वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. तसेच भारताची बाजारपेठ नवीन नवीन गोष्टी अंमलात आणण्यासाठी नेहमीच तयार असते असंही त्यांनी सांगितले. मात्र भारतात एअर वाहतूक सुरू करण्याबाबत सावधानता बाळगणं गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या खूप असल्याने येथे काम करण्याचा वेगळा आनंद असतो असं निखिल गोयल यांनी सांगितलं होतं.