200, 2000 रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 09:35 AM2018-05-14T09:35:43+5:302018-05-14T10:55:28+5:30
200, 2000 रुपयांच्या खराब, फाटलेल्या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा....
मुंबई - नोटांबदी लागू झाल्यानंतर RBIकडून 200 रुपये व 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. पण व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतच्या समस्या वाढताहेत. कारण, तुमच्याजवळ असलेल्या 200 किंवा 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही कारणामुळे जर खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय, बँकांमध्ये जमादेखील करता येणार नाहीयेत.
कारण, चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. यामुळे फाटलेल्या, खराब अवस्थेत असलेल्या 200 व 2000 रुपयांचा नोटा तुमच्याकडे असतील तर वेळीच सावध व्हा. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणं ( नोट एक्सचेंज), जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतो. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा एक भाग आहे. या कायद्यामध्ये 5, 10, 50, 100, 500 रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र 200 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा यात उल्लेखच नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयनं या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या नियमांमध्ये बदल केलेले नाहीत. यामुळे 200 किंवा 2000 नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलतादेखील येणार नाहीयेत.
8 नोव्हेंबर 2016मध्ये नोटाबंदी नियम लागू झाल्यानंतर 2,000 रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली यानंतर 200 रुपयांची नोट ऑगस्ट 2017मध्ये वापरात आली. आरबीआयनं आता 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे.
बँकर्संकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन सीरिजमध्ये फाटलेल्या-खराब झालेल्या नोटांचं प्रमाण कमी आहे. मात्र आरबीआयच्या नियमांमध्ये बदल केले गेले नाहीत तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.