मिठासोबत तुम्ही खाता प्लॅस्टिक; आयआयटीच्या अभ्यासातून निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:31 AM2018-09-06T04:31:17+5:302018-09-06T04:32:14+5:30
जेवणात तुम्ही मिठासोबत प्लॅस्टिकही खाता, असे सांगितले, तर धक्का बसेल. अनेक लोकप्रिय ब्रँडच्या मिठात प्लॅस्टिकचे ६२६ सूक्ष्म कण असतात, असे मुंबई ‘आयआयटी’च्या दोन वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
नवी दिल्ली : जेवणात तुम्ही मिठासोबत प्लॅस्टिकही खाता, असे सांगितले, तर धक्का बसेल. अनेक लोकप्रिय ब्रँडच्या मिठात प्लॅस्टिकचे ६२६ सूक्ष्म कण असतात, असे मुंबई ‘आयआयटी’च्या दोन वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. रोजच्या आहारात पाच ग्रॅम मीठ खातो, असे गृहित धरल्यास मिठातून पोटात ११७ मायक्रोग्रॅम मायक्रो प्लॅस्टिकही जाते.
प्रा. अमृतांशु श्रीवास्तव व चंदन कृष्णा सेठ यांनी केलेल्या यांचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड पोल्युशन रीसर्च’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. फेकले जाणारे प्लॅस्टिक समुद्रातही पोहोचते. तेथे भरती-ओहोटीच्या घुसळणीने अतिसूक्ष्म कणांचा भुगा होतो. मिठागरांमध्ये समुद्राचे भरतीचे पाणी अडवून बाष्पिभवनाने मीठ तयार होते, तेव्हा त्यात पाण्यात विरघळू न शकलेले हे प्लॅस्टिकही येते.
वाळूच्या साध्या-सोप्या गाळणीचा वापर केला, तर समुद्राच्या पाण्यातील वजनाने ८५% मायक्रोप्लॅस्टिक सहजपणे वेगळे काढता येऊ शकते.
-प्रा.अमृतांशु श्रीवास्तव,
मुंबई आयआयटी